
कश्मीरमधील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या गुलमर्गमध्ये रविवारी झालेल्या ताज्या हिमवर्षावामुळे पर्यटकांची मोठी गर्दी झाली. विशेषतः गोंडोलाजवळ लांबच लांब रांगा दिसत होत्या. तिथे शेकडो पर्यटक तासन्तास थांबले होते. जगातील सर्वात उंच केबल कार सेवा असलेली गुलमर्ग गोंडोला केबल सेवा दोन टप्प्यांत चालते.
पहिला टप्पा गुलमर्ग ते कांगदुरी आणि दुसरा कांगदुरी ते अफारवतपर्यंत आहे. ताजी बर्फवृष्टी सुरू असल्याने केबल कारमध्ये बसून नितांतसुंदर निसर्ग बघणे ही पर्यटकांना पर्वणी असते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंडोलाचे दोन्ही फेज सुरू होते. मात्र अचानक पर्यटकांची गर्दी वाढली आणि नियोजन विस्कळीत झाले. तिकीट काऊंटरपासून पॉईंटपर्यंत मोठय़ा रांगा लागल्या. बर्फाच्छादित पर्वतरांगांसमोर पर्यटक पह्टो काढत होते. स्लेजिंगचा आनंद घेत होते. तासन्तास रांगेत उभे राहून पर्यटकांनी तिकीट काढली. मात्र तिकीटं महाग होती, अशी तक्रार काही पर्यटकांनी केली.

























































