
आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत हिंदुस्थानी ऍथलीट्सनी आपली पदककमाई चौथ्या दिवशीही कायम ठेवली. दोन दिवसांपूर्वी 10 हजार मीटर शर्यतीत सुवर्णवीर ठरलेल्या गुलवीर सिंहने पाच हजार मीटर शर्यतीत विक्रमी वेळत सुवर्ण जिंकत डबल धमाका केला. त्याने पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारताना हे पदक जिंकून इतिहास घडवला. तसेच महिलांच्या लांब उडीत पूजाने 1.89 मीटर लांब झेप घेत सुवर्णपदकही जिंकले, तर तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत पारुल चौधरीने राष्ट्रीय विक्रमासह रौप्यपदकाची कमाई केली.
गुलवीरची सोनेरी कामगिरी विक्रमी ठरली. तो गोपाल सैनी (1981) आणि जी. लक्ष्मणन (2017) यांच्यानंतर आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या पाच हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारा तिसरा हिंदुस्थानी ठरला. त्याने 13 मिनिटे 24.77 सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्णपदक आपल्या नावावर केले होते. याचबरोबर त्याने 2015 साली मोहमद अल गरनीने नोंदवलेल्या 13 मिनिटे 34.47 सेकंदांच्या वेळेला मागे टाकत नवा आशियाई विक्रम रचला. गुलवीरने 2023 मध्ये बँकॉक येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत पाच हजार मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकले होते.
गुलवीरने थायलंडच्या किएरान टुंनिवाटे (13 मिनिटे 24.97 सेकंद) आणि जपानच्या नागिया मोरी (13 मिनिटे 25 सेकंद) यांना मागे टाकून सुवर्णपदक काबीज केले. याच शर्यतीत हिंदुस्थानचा अभिषेक पाल 13 मिनिटे 33.51 सेकंदासह सहावा आला. एकाच आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पाच हजार मीटर आणि दहा हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत दुहेरी सुवर्णपदक जिंकणारा गुलवीर सिंग हा इतिहासातील दुसरा हिंदुस्थानी ठरला आहे.
पूजाची सुवर्ण उडी
पूजाने उंच उडीत आपली दुसरी सर्वोत्तम झेप घेताना 1.89 मीटर उंच उडी मारत सुवर्णावरही आपले नाव कोरले. तिने आज आपला 20 वर्षांखालील स्पर्धेत केलेला विक्रमही मोडीत काढला. 18 वर्षांची पूजा उंच उडीत सुवर्ण जिंकणारी दुसरी महिला ऍथलीट ठरली आहे. याआधी बॉबी अलॉयसियसने 2000 सालच्या स्पर्धेत सुवर्ण तर 2002 च्या स्पर्धेत रौप्य जिंकले होते. त्याआधी पारुल चौधरीने महिलांच्या स्टीपलचेस शर्यतीत 9 मिनिटे 12.46 सेकंद वेळ देत नवा राष्ट्रीय विक्रमही प्रस्थापित केला. तिने नुकत्याच झालेल्या दोहा डायमंड लीगमध्ये 9 मिनिटे 13.39 सेकंद वेळ नोंदविली होती.