भाजप आमदारच म्हणाले…नेपाळसारखे गृहयुद्ध हिंदुस्थानातही भडकू शकते

हिंदुस्थानचे शेजारी राष्ट्र नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये जो आगडोंब उसळला आहे तशीच परिस्थिती हिंदुस्थानातसुद्धा उद्भवू शकते. हिंदुस्थानात गृहयुद्धासारखी स्थिती कधीही उद्भवू शकते, असे वादग्रस्त विधान मध्य प्रदेशातील गुनाचे भाजपचे आमदार पन्नालाल शाक्य यांनी केले आहे. देशात गृहयुद्धासारखी परिस्थिती उद्भवल्यास ती हाताळण्यासाठी देशातील 18 ते 30 वर्षांपर्यंतच्या मुलांना लष्करी प्रशिक्षण द्यायला हवे, मुलांसाठी प्रशिक्षण बंधनकारक करावे, असेही ते या वेळी म्हणाले.

श्रीलंकेत आग लावली, बांगलादेशात सत्ता उलथवून टाकली, अफगाणिस्तानातील परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. तेथेही बरीच उलथापालथ झाली. पाकिस्तानात दहशतवाद्यांची एक फौज तयार केली जात आहे. आता लोकांनी नेपाळला उद्ध्वस्त केले आहे. आता सर्वांच्या नजरा हिंदुस्थानकडे लागल्या आहेत. त्यामुळे आपण जर वेळीच याकडे लक्ष दिले नाही, तसेच 18 ते 30 वर्षांपर्यंतच्या तरुणांना तयार केले नाही तर अशा घटना घडू शकतात. ज्यामुळे आपल्या देशात गृहयुद्ध भडकू शकते, असे पन्नालाल शाक्य म्हणाले.

हा लष्कर आणि लोकशाहीचा अवमान; काँग्रेसचे टीकास्र

पन्नालाल शाक्य यांच्या या विधानावर काँग्रेसने जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेसचे प्रदेश महासचिव अभय तिवारी यांनी म्हटले की, भाजपने आपला राजकीय अजेंडा लष्कर किंवा मुलांवर लादू नये. भाजपच्या भ्रष्टाचाराला देशातील जनता पंटाळली आहे. गृहयुद्धासारखी स्थिती उद्भवू शकते असे शब्द वापरणे हे लष्कर आणि लोकशाहीचा अवमान करण्यासारखे आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.