शास्त्रीय गायन अन् वादनाची मेजवानी; प्रभादेवीत गुणीदास संगीत संमेलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बहुप्रतीक्षित ‘गुणीदास संगीत संमेलन’ प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर येथे 16 ते 18 डिसेंबरदरम्यान दररोज सायंकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. गुणीदास संगीत संमेलनाच्या या 45 व्या पर्वामध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील आघाडीचे गायक, वादक सहभागी होणार आहेत.

‘गुणीदास संगीत संमेलन’चे आयोजन ‘महाराष्ट्र ललित कला निधी’ या संस्थेच्या माध्यमातून केले जाते. या संस्थेची स्थापना प्रख्यात गायक दिवंगत सी. आर. व्यास यांनी केली होती. संमेलनाच्या पहिल्या दिवशी बासरीवादक राकेश चौरसिया यांचे वादन होणार असून त्यांना तबल्यावर आदित्य कल्याणपूर यांची साथ आहे. पहिल्या दिवसाची सांगता पद्मभूषण बेगम परवीन सुलताना यांच्या गायनाने होणार आहे. त्यांना तबल्यावर मुकुंदराज देव आणि हार्मोनियमवर श्रीनिवास आचार्य साथ देतील.

महोत्सवाच्या दुसऱया दिवसाची सुरुवात शोभा चौधरी यांच्या गायनाने होईल. या वेळी त्यांना तबल्यावर मंदार पुराणिक साथ देणार आहेत तर हार्मोनियमवर श्रीनिवास आचार्य साथ देतील. या दिवसाची सांगता सितारवादक नीलाद्री कुमार यांच्या अदाकारीने होणार आहे. त्यांना तबल्यावर ओजस अधिया साथ देणार आहेत. संमेलनाच्या शेवटच्या दिवशी सुरुवातीला जयतीर्थ मेवुंदी त्यांचे गायन सादर करणार आहेत. त्यांना तबल्यावर पांडुरंग पवार आणि हार्मोनियमवर आदित्य ओक साथ देणार आहेत. संमेलनाची सांगता जगप्रसिद्ध संतूरवादक पद्मश्री पंडित सतीश व्यास यांच्या संतूरवादनाने होणार आहे.