गुंठेवारी चळवळ संघर्ष समिती शिवसेनेत विलीन, चंदन चव्हाण यांनी बांधले ‘शिवबंधन’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून गुंठेवारी चळवळीचे जनक चंदन चव्हाण यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी ‘गुंठेवारी चळवळ संघर्ष समिती’ही शिवसेनेत विलीन करत असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, शिवसेना उपनेते, सांगली-सातारा जिल्हा संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील, सांगली जिल्हाप्रमुख संजय विभुते, आनंद पवार उपस्थित होते.

‘गुंठेवारी चळवळ संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य’ ही संघटना गेली 27 वर्षे कार्यरत आहे. या समितीच्या माध्यमातून चंदन चव्हाण यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर गुंठेवारी चळवळ पोहोचवली आणि हजारो नागरिकांना लाभ मिळवून दिला. ही गुंठेवारी चळवळ संघर्ष समिती आता शिवसेनेत सामील झाली. या समितीच्या अनेक कार्यकर्त्यांनी मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला. आता यापुढे ‘शिवसेना गुंठेवारी विकास समिती’ या नावाने ही समिती कार्यरत राहणार असून, या समितीचे राज्यप्रमुख म्हणून चंदन चव्हाण यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील गुंठेवारीधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी ही समिती काम करणार आहे. शिवसेनेसोबत आल्याने सर्वसामान्य माणसाला अधिकाधिक न्याय मिळवून देता येईल. लवकरच राज्यातील
अनेक भागात जाऊन तेथील समस्या जाणून घेतल्या जातील आणि गोरगरिबांना हक्काचा निवारा होईल, यासाठीप्रयत्न केले जातील, असे चंदन चव्हाण यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या