राजस्थानात गुर्जर समाजाचे आंदोलन पेटले, लोहमार्गावर तंबू थाटून ‘रेल रोको’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जयपूर

पाच टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राजस्थानात गुर्जर समाजाचे तीव्र आंदोलन दोन दिवसांपासून पेटले आहे. त्यात आंदोलकांनी लोहमार्गावर चक्क ‘तंबू’ थाटून रेल रोको करण्याचा मार्ग अवलंबला आहे. या आंदोलनामुळे शुक्रवारी 25 गाडय़ांना फटका बसला असून शनिवारी 14 ट्रेन रद्द करण्यात आल्या.
गुर्जर समाजातील आंदोलकांनी सवाई माधोपूरच्या मलारना स्टेशन आणि निमोदा रेल्वे स्टेशनदरम्यान रेल्वे रुळावर तंबू थाटून ठिय्या आंदोलन केले आहे. त्यामुळे दिल्ली-मुंबईदरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.

सरकार चर्चेला तयार – गेहलोत
काँगेसचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुर्जर समाजाच्या आंदोलकांशी चर्चेला सरकार तयार आहे असे आज सांगितले.

आरक्षण दिल्याचे पत्रच आता हवे -बैंसला
आता आरक्षण दिल्याचे सरकारचे पत्र हाती पडल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही असे गुर्जर आरक्षण संघर्ष समितीचे संयोजक कर्नल किरोडीसिंह बैंसला यांनी आज स्पष्ट केले.