स्वर संस्कृती म्युझिक अकॅडमीतर्फे ‘गुरुवंदन’, गुरूंना समर्पित एक सांगीतिक अभिवादन

प्रख्यात सतारवादक रवी चारी यांच्या नेतृत्वाखालील स्वर संस्कृती म्युझिक अकॅडमी यांच्यातर्फे ‘गुरुवंदन – ए ट्रिब्यूट टू अवर गुरूज’ हा एक विशेष सांगीतिक कार्यक्रम रविवार 3 ऑगस्टला सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत अटल स्मृती उद्यान सभागृह, शिंपोली, बोरिवली पश्चिम येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये, अकॅडमीत शिकणारे विद्यार्थी शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत सादर करत आपल्या गुरूंना अभिवादन करतील. याच कार्यक्रमात पं. रवी चारी आणि प्रख्यात तबला वादक योगेश सामसी यांचेही विशेष सादरीकरण होणार आहे.

स्वर संस्कृती म्युझिक अकॅडमी केवळ संगीत शिक्षणापुरती मर्यादित नसून समाजोपयोगी कार्यातही अग्रणी आहे. संस्थेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना व गरजू कलाप्रेमींना शिष्यवृत्ती दिल्या जातात. अकॅडमीत अनेक विद्यार्थी विशारद, अलंकार, बीए, एमए, पीएचडी करत असून, गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांची तयारी करून घेतली जाते. येथील काही विद्यार्थी ऑल इंडिया रेडिओचे ग्रेडेड आर्टिस्टही आहेत. ज्येष्ठ व मान्यवर कलावंतांचा सत्कार अकॅडमीच्या वतीने सन्मानपूर्वक केला जातो, ज्यातून संगीत परंपरेतील योगदानाचे कौतुक करण्यात येते.

या अकॅडमीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना रवी चारींसोबत संपूर्ण भारतभर विविध ठिकाणी सिम्फनी सादर करण्याची संधी मिळते; जो त्यांच्यासाठी एक समृद्ध आणि व्यासपीठात्मक अनुभव ठरतो.

‘गुरुवंदन’ ही केवळ एक मैफल नसून, ती गुरूंप्रती कृतज्ञतेची, श्रद्धेची आणि निष्ठेची भावांजली आहे.