संशयाचं भूत मानगुटीवर बसलं; लिव्ह इन पार्टनरच्या गुप्तांगात सॅनिटायझर टाकून पेटवून दिलं, नराधम प्रियकराला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच गुरूग्राममध्ये एका तरूणाने आपल्या प्रेयसीसोबत अमानवीय कृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली. येथे त्रिपुराची रहिवाशी असलेली आणि गुरुग्राममध्ये BSC बायोटेकचे शिक्षण घेणारी 19 वर्षीय तरुणी प्रियकर शिवमसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. चारित्र्यावर संशय घेऊन शिवमने तिला तीन दिवस कोंडून ठेवले आणि बेदम मारहाण केली. क्रूरतेची सीमा ओलांडत त्याने तरुणीच्या गुप्तांगावर सॅनिटायझर ओतून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे तिची प्रकृती अत्यंत गंभीर झाली आहे.

डेटिंग अ‍ॅपवर झाली होती ओळख
मिळालेल्या मााहितीनुसार, पीडित तरूणी आणि आरोपी शिवम यांची सप्टेंबर 2025 मध्ये एका ऑनलाईन डेटिंग अॅपवर ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. शिवमने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि त्यानंतर दोघेही गुरुग्राममधील सेक्टर-69 परिसरात एकत्र राहू लागले. मात्र, काही काळानंतर शिवम तिच्यावर संशय घेऊ लागला आणि किरकोळ कारणावरून तिला मारहाण करू लागला. 16 फेब्रुवारी रोजी हे भांडण विकोपाला गेले आणि पीडितेला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, आरोपीने तिला घरात डांबून ठेवले होते. त्याने तिच्या डोक्यावर स्टीलची बाटली मारली, तिचे डोके भिंतीवर आणि कपाटावर आदळले. इतकेच नाही तर चाकूने तिच्या पायावर वार करत तिला कायमचे अपंग करण्याची धमकी दिली. आरोपीने तिचे नग्न व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेलही केले. 18 फेब्रुवारी रोजी पीडितेने शिवमच्या फोनवरून आपल्या आईला फोन लावून तिच्यासोबत बंगाली भाषेत संभाषण केले आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यावेळी या प्रकाराचा उलगडा झाला.

तरुणीच्या आईने तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणीची सुटका केली आणि तिला रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. पीडितेच्या आईने आरोपीवर बलात्कार आणि खुनाच्या प्रयत्नाचे कलम लावण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी आरोपी शिवमला अटक करून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पीडितेचा सविस्तर जबाब नोंदवण्यात आला आहे.