हिंगोली जिल्ह्यात दीड कोटीचा गुटखा पकडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । आखाडा बाळापुर

अकोला ते नांदेड राज्य मार्गावरिल आखाडा बाळापुर ते डोंगरकडा रस्त्यावर ज्वारीच्या पोत्यातून गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक आखाडा बाळापुर पोलिसांनी शनिवार दि.13 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता पकडला आहे. यामध्ये सुमारे 1 कोटी 63 लाख रुपयांच्या गुटख्याचे घबाड सापडले आहे.

दिल्ली येथून एक ट्रक लातूरकडे निघाला होता. या ट्रकमध्ये गुटखा असल्याची माहिती आखाडा बाळापूरच्या पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सकाळपासूनच पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चिंचोलकर, जमादार भगवान वडकिले चव्हाण, शेख, मुलगीर व पोले यांच्या पथकाने वारंगा फाटा येथे वाहनांची तपासणी सुरू केली होती. नागपूरकडून हदगाव मार्गे नांदेड कडे जाणारी वाहने तसेच हिंगोली कडून नांदेड कडे जाणारी वाहने वारंगा येथे तपासणी केली जात होती. यावेळी पोलिसांनी एक ट्रक थांबवून चौकशी सुरु केली. मात्र चालकाला वाहतूक करत असलेल्या साहित्याबाबत उत्तरे देता आली नाही. त्यामुळे पोलिसांनी तातडीने तपासणी सुरू केली. ट्रक क्र.आरजे 11 जीए 9845 ला वारंगा फाटा जवळ पकडले. मागील बाजूस ज्वारीची पोती आढळून आली. तसेच वाहनाचे सूटे भाग, कुलुप, जीन्स पँट, टी-शर्ट असे साहित्य ठेवण्यात आले होते. तर वरच्या भागात पुठ्ठे तर समोरील भागांमध्ये ज्वारीच्या पोत्यात खुला गुटखा लपवलेला आढळून आला. या ट्रकमध्ये सुमारे अडीचशे पोते गुटखा असून हा गुटखा पॅकींग करण्यासाठी लातूर येथे जात होता. ट्रकमध्ये 234 पोते गुटखा सापडला. याची किंमत 1 कोटी 63 लाख असुन, ट्रकची किंमत 30 लाख रुपये असा एकुण 1 कोटी 93 लाखाचा माल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी ट्रक चालक जितेंद्र रमेश गौंड (22 ) रा.वसई डांग राजस्थान व लोकेंद्र पातीराम भारती (21) रा.कोंल्हुआ यांना अटक करण्यात आले आहे. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.