
सामना प्रतिनिधी । नांदेड
मुदखेड मार्गे भोकर शहरात एका अॅटोरिक्षातून १ लाख ६० हजार रुपये किमतीचा अवैध गुटखा आणणाऱ्यास दि. ३० जुलै रोजी रात्री भोकर पोलिसांनी सापळा रचून मुद्देमालासह जेरबंद केले. याच महिन्यातील १५ दिवसाच्या आतील ही दुसरी धाडसी कारवाई असल्याने अवैध गुटखा विक्रेते व तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली.
एका अॅटोरिक्षातून राज्यात बंदी असलेला अवैध गुटखा येत असल्याची गोपनीय माहिती भोकर पोलिसांना मिळाल्यावरुन पो. निरीक्षक आर.एस.पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार नामदेव जाधव, पो.कॉ.शिवाजी पाटील, पो.कॉ.चंद्रकांत अडकिलवार यांच्या पथकाने सापळा रचून मुदखेड – भोकर रस्त्याने शहरातील व्यंकटेश नगर, भोकर येथे येत असलेली ऑटोरिक्षा क्र. एम. एच. २६ के. २२०१ ला पकडली. यावेळी झडती घेतली असता त्यात जवळपास १ लाख ६० हजार रुपये किमतीचा अवैध गुटखा सापडला. मुद्देमालासह ऑटोरिक्षा व चालक शेख मोहसीन शेख बाबु रा. भोकर याला ताब्यात घेण्यात आले. गेल्या १५ दिवसांपूर्वीच दि. ८ जुलै रोजी याच रस्त्याने भोकर शहरात विक्रीसाठी येणारा २ लाख रुपये किमतीचा अवैध गुटखा भोकर पोलिसांनी पकडला होता. दुसऱ्यांदा याच मार्गाने हा गुटखा आल्याने या अॅटोरिक्षा चालकाची कसून चौकशी केली असता पकडण्यात आलेला हा अवैध गुटखा शहरातील शेख रज्जाक शेख हबीब यांचा असल्याचे त्याने सांगितले.





























































