
अत्यावश्यक वस्तू पुरविण्याची परवानगी घेत पीठाच्या पोत्यात गुटख्याचे पुडे भरून त्याची वाहतूक करताना गेवराईजवळील महारटाकळी चेक पोस्टवर एक आयशर टेम्पो पोलीसांनी पकडला. पोलिसांनी पीठाचे पोते उघडण्यास सुरूवात केली तेव्हा पोत्यामध्ये पिठाबरोबर गुटख्याचे पुडेही दिसून आले. हा टेम्पो पुर्णपणे पिठाच्या पोत्याने भरला असून किती पोत्यामध्ये गुटखा आणि किती पोत्यामध्ये पीठ आहे, याची मोजणी पोलीस करत होते. सर्वच पोत्यांमध्ये गुटखा असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
टेम्पो हा हैद्राबाद येथून नाशिककडे जात होता. ही कारवाई चकलांबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश कोरडे यांनी केली. चकलांबा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश कोरडे महारटाकळी येथील चेक पोस्टवर कार्यरत आहेत. याठिकाणी शनिवारी सकाळी 11 वाजता बीडमधून परजिल्ह्यात जाणार्या प्रत्येक वाहनाची पोलीस उपनिरीक्षक योगेश कोरडे आणि त्यांची टीम कसून चेकींग करत होती. यावेळी आयशर टेम्पोमधून पीठाचे पोते परजिल्ह्यात नेत असल्याचे चालकाने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी थांबवून त्याची तपासणी केली. यावेळी पोत्यामध्ये गुटखा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी हा टेम्पो थेट चकलांबा पोलीस ठाण्यात लावून चालकासह अन्य एकाला ताब्यात घेतले. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश कोरडे, पोलीस हवालदार कांबळे, कांदे, पो.ना.सय्यद चॉंद यांनी केली. यावेळी महसूलचे बी.बी.मगर उपस्थित होते. अन्न औषध प्रशासनाच्या अधिकार्यांना याबाबत माहिती दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

























































