अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुटखा, पानमसाल्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर- सोलापूर रोडवर दरेवाडी शिवारात कँन्टोन्मेंट नाका परिसरामध्ये अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली कांद्याच्या गोण्याखाली लपवून गुटखा, पानमसाला आदीसह तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी घेऊन जाणारा टेम्पो एलसीबीच्या पोलिसांनी पकडल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईत सुमारे 5 लाख 42 हजार 256 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीमध्ये सलीम युसूफ शेख (वय 24,रा.भारतनगर, ता.गंगापूर, जि.संभाजीनगर), संतोष अशोक शिंदे (वय 34, रा.श्रध्दानगर, ता.पैठण, जि.संभाजीनगर) यांना अटक करण्यात आली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, एलसीबीच्या पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सोलापूर रोडवरील दरेवाडी शिवारातील कँन्टोन्मेंट नाका या ठिकाणी सापळा लावला. या ठिकाणी नगरच्या दिशेने येणारा अशोक लेलँन्ड टेम्पो पोलिसांनी अडवला. दोन पंचासमक्ष टेम्पोची तपासणी केली असता, अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली कांद्याच्या गोण्याखाली लापवून गुटखा, पानमसाला आदींसह तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक करीत असल्याचे उघड झाले. या कारवाईत पोलिसांनी 5 लाख 42 हजार 256 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सलीम युसूफ शेख,, संतोष अशोक शिंदे या दोघांना अटक केली. पोलिसांनी चौकशी केली असता हा तंबाखूजन्य माल सचिन म्हस्के (रा.वाळुंज, ता.गंगापूर) याच्या मालकीचा असल्याची माहिती त्यांनी दिली. दोघांना पुढील कारवाईसाठी एलसीबी पोलिसांनी भिंगार कँम्प पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, नगर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोलीस नायक संतोष लोंढे, रविंद्र कर्डिले, पोलीस कॉन्स्टेबल रोहित मिसाळ, प्रकाश वाघ, राहुल सोळुंके आदींच्या पथकाने ही कारवाई केली.