
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
सुप्रसिद्ध लेखक अमिताव घोष यांना साहित्य विश्वातील मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्ञानपीठ पुरस्काराच्या निवड समितीने शुक्रवारी अमिताव यांच्या नावाची घोषणा केली.
11 जुलै 1956मध्ये कोलकाता येथे जन्मलेल्या घोष यांचं शिक्षण दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन महाविद्यालयात झालं. तर उच्च शिक्षण दिल्ली स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये झालं. उच्च शिक्षणानंतर त्यांनी ‘द सर्कल ऑफ रिजन’ ही कादंबरी लिहिली. ही कादंबरी तुफान गाजली आणि त्यानंतर घोष प्रसिद्धीच्या झोतात आले. घोष यांच्या शॅडो लाईन्स या कादंबरीलाही साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. घोष यांनी इंडियन एक्सप्रेसमधून काही काळ पत्रकार म्हणूनही काम केलं होतं. याआधी त्यांना पद्मश्री हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.























































