
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाच्या तिसऱ्या दिवशी मशिदीच्या तळघरात मूर्तींचे अवशेष आढळले आहेत, असा दावा हिंदू पक्षकारांच्या प्रवक्त्याने केला आहे. तसंच, या मूर्तींसह काही भग्नावस्थेतले खांबही आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.
या अवशेषांसह असेही काही अवशेष मिळण्याची शक्यता आहे, ज्यांमुळे ज्ञानवापीचं मूळ स्वरू बदललं गेल्याच्या दाव्याला दुजोरा मिळेल, असंही या प्रवक्त्यांचं म्हणणं आहे. एशियन नेटने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय पुरातत्व विभाग सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षण करत असून रविवारी तळघराच्या सर्वेक्षणाचं काम सुरू करण्यात आलं. यापूर्वी तळघराच्या चाव्या देण्यास मुस्लीम पक्षकारांनी नकार दिला होता.
मात्र, तिसऱ्या दिवशी तळघराच्या सर्वेक्षणात मुस्लीम पक्षकार आणि त्यांचे प्रवक्तेही हजर होते. यावेळी मशिदीच्या घुमट, तळघर आणि अन्य भागांचं सर्वेक्षण करण्यात आलं. त्या भागातून माती, विटा आणि दगडांचे काही नमुने घेतले गेले. या नमुन्यांच्या परीक्षणानंतरच ज्ञानवापी मशिदीच्या काळाविषयी उलगडा होणार आहे.




























































