
सामना प्रतिनिधी, नवी मुंबई
देवगडचा आंबा म्हणजे हापूसचा ‘बाप’च ओळखला जातो. या आंब्याची गोडीच निराळी असल्याने त्यावर खवय्यांच्या दरवर्षी उडय़ाच पडतात. सोमवारी एपीएमसी मार्केटमध्ये तब्बल दोन हजार पेटय़ांची आवक झाली. मात्र दर आवाक्याबाहेर असल्याने भाव खाल्लेल्या हापूसच्या ‘बापूस’ला ग्राहकांची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
देश आणि विदेशातील आंबा खवय्यांना भुरळ घालणाऱ्या कोकणातील हापूस आंब्याची आवक दिवसेंदिवस एपीएमसी मार्केटमध्ये वाढत चालली आहे. काल दोन हजार पेटय़ा बाजारात आल्या. आवक जरी वाढली असली तरी भाव उतरलेले नाहीत. आंबा हजार ते दीड हजार रुपये डझन या दराने विकला गेला आहे. पुढील आठवडय़ात आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. या सर्व पेटय़ा अडीच हजार ते सहा हजार रुपये या दराने विकल्या गेल्या. आंब्याची आवक जरी वाढत चालली असली तरी मार्केटमध्ये मालाला उठाव नाही. व्यापाऱयांवर ग्राहकांची प्रतीक्षा करण्याची वेळ ओढवली आहे.




























































