क्वोरावरती हॅकर्सचा डल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

जगात अनेक लोकांना अनेक चित्रविचित्र प्रश्न पडत असतात. नेलकटरच्या दांडय़ाखाली असलेल्या इतर छोटय़ा छोटय़ा साधनांचा उपयोग काय? इथपासून ते ‘एसी दुरुस्त कसा करावा’ असे अनेक विषयातले अनेक प्रश्न लोकांना पडत असतात. कधी काही प्रश्न विचारायची लाज वाटते तर कधी ते कोणाला आणि कुठे विचारावे याची नसलेली माहिती यामुळे हे प्रश्न मनातच राहतात. मात्र इंटरनेटचे आगमन झाले आणि जगच एकत्र आले. प्रश्न विचारणारे आणि या प्रश्नांची उत्तरे माहिती असलेले सहज एकमेकांशी संवाद साधायला लागेल. ‘क्वोरा’ हा इंटरनेटवरचा असाच एक प्लॅटफॉर्म आहे. इथे जगभरातील अनेक यूजर्स आपल्या मनातल्या शंका, प्रश्न उपस्थित करतात आणि त्या त्या क्षेत्रातले जगभरातील तज्ञ त्यावरती मार्गदर्शन करत असतात. क्वोराचा हा प्लॅटफॉर्म जगभरात प्रचंड प्रसिद्ध आहे आणि इथे करोडो यूजर्सचा दिवसभर वावरदेखील असतो. सामान्यज्ञानापासून ते चित्रपट, विज्ञान, गणित, भाषा, राजकारण, खेळ असा कोणताही विषय इथे चर्चेत घेता येतो. मात्र या अशा चांगल्या कार्याला वाहिलेल्या प्लॅटफॉर्मवरतीदेखील नुकताच हॅकर्सनी हल्ला केला आणि करोडो यूजर्सचा डाटा पळवला. क्वोराकडून मिळालेल्या माहितीनुसार या डाटामध्ये यूजर्सची नावे, इनक्रिप्टेड पासवर्ड, ईमेल आणि इंपोर्ट केलेल्या डाटाचा समावेश आहे. थर्ड पार्टीच्या मदतीने हॅकर्सला बेकायदेशीरपणे क्वोराचा सिस्टीमचा ऍक्सेस मिळाला आणि त्यांनी हा डाटा पळवला. तब्बल 10 करोड यूजर्सचा डाटा हॅकर्सनी पळवला आहे. कंपनीकडून क्वोराच्या माहिती चोरीला गेलेल्या सर्व यूजर्सना ईमेल करून या संदर्भातली सर्व माहिती देण्यात येत आहे. क्वोराच्या सीईओ ने स्वतः या संदर्भात ब्लॉगवरती पोस्ट लिहिलेली असून या घटनेची पूर्ण माहिती दिलेली आहे. ही माहिती चोरीला गेल्याची जाणीव झाल्याबरोबर अनेक यूजर्सच्या खात्यांना लॉग आऊट करण्यात येत आहे. तसेच जुने सर्व पासवर्ड इनव्हॅलीड करण्यात आलेले आहेत आणि ग्राहकांना नवे पासवर्ड घेण्यास सांगण्यात आले आहे.