हिंदुस्थानी सैन्याने पीओकेच काय, लाहोर, कराचीही घेतले असते

हिंदुस्थानी सैन्याला आणखी चार दिवस मिळाले असते तर त्यांनी पाकव्याप्त कश्मीरच काय लाहोर, कराचीही घेतले असते. मात्र, सरकारनेच कच खाल्ली, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारला फटकारले. आता पीओके पाकिस्तानकडे मागताना डोनाल्ड ट्रम्पला विचारलेय का, असा त्यांनी टोलाही हाणला.

नाशिक येथे मंगळवारी खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. परराष्ट्रमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानने पीओके सोडावा, अशी भूमिका घेतल्याच्या प्रश्नावर ते बोलत होते. एवढा दम भरल्यावर नक्कीच पाकिस्तान पीओके सोडेल बहुतेक, असे म्हणत मग युद्धच का पुकारले, असा सवालही संजय राऊत यांनी केला. हिंदुस्थानी सैन्याला अजून चार दिवस मिळाले असते, तर त्यांनी पीओकेच काय लाहोर, कराचीही घेतले असते. मात्र, केंद्र सरकारनेच ट्रम्प यांच्या दबावापुढे कच खाल्ली, असे ते म्हणाले.

मिंध्यांनी पक्ष निशाणी खिचडी ठेवावी

मंत्री उदय सामंत हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेले, या प्रश्नावर खासदार संजय राऊत म्हणाले की, कुणी कुणाकडे जाण्यावर लोकशाहीत बंधनं नाहीत. मात्र, इथे पराभव समोर दिसत असल्याने एक छुपं राजकारण सुरू आहे. मिंधे हे भाजप आणि अजित पवारांबरोबर आहेत तरी अन्य पक्षांशी संधान जुळवतात यावरून त्यांचं अस्तित्वं काय, हे दिसून येतंय, असा निशाणा साधला. शिवाजी पार्क भागात खिचडी मिळणारी अनेक उत्तम हॉटेल असल्याने उदय सामंत गेले असावेत, यापुढे त्यांनी त्यांच्या पक्षाची निशाणी साबुदाणा खिचडीच ठेवावी, असा टोलाही हाणला.

महाराष्ट्रद्रोह्यांसोबतते जाणार नाहीत

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आम्हीसुद्धा अनेक वर्षे काम करतोय, त्यांच्या भूमिका आम्हाला माहित आहेत. ज्या विचारांसाठी आतापर्यंत त्यांनी संघर्ष केला, अनेक वर्ष विरोधी पक्षातही बसले, त्या जातीयवादी, धर्मांध शक्तींबरोबर, तसेच शिवसेना, राष्ट्रवादी फोडणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांबरोबर ते जाणार नाहीत. ज्यांना जायचे होते, ते निघून गेले, ते तेथे अजिबात सुखी नाहीत, त्यांचे चेहरे बघा, असेही खासदार संजय राऊत म्हणाले.