
हडपसरमधील मांजरी रेल्वे गेटजवळ तरूणाचा खून करून मृतदेह टाकला असल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित तरुण कुविख्यात अरुण गवळी याच्या टोळीशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत पोलिसांनी दुजोरा दिला नाही. सुरेश राजीव रेगुंठा (वय 27, रा. शास्त्रीनगर, येरवडा) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश येरवड्यातील शास्त्री नगरचा रहिवाशी होता. 25 जानेवारीला तो बेपत्ता झाला असल्याची नोंद येरवडा पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. त्याचा शोध घेतला जात होता. मात्र, आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह मांजरी येथील रेल्वे गेट परिसरात मिळून आला. ही माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासात संबंधित तरूण सुरेश रेगुंठा असल्याचे उघडकीस आले आहे.






























































