हडोळती- बीएसएनएलच्या विस्कळीत सेवेमुळे शेतकऱ्यांचे हाल

440

अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथे सर्वात मोठी बाजारपेठ असल्यामुळे परिसरातील असंख्य नागरिकांचा संपर्क गावाशी येतो. येथे व परिसरात असंख्य ग्राहक बीएसएनएल सेवेशी निगडीत आहेत. परंतु गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून ही सेवा विस्कळीत झाली आहे. या तांत्रिक बिघाडामुळे दूरध्वनी, बीएसएनएल मोबाईल धारक त्रस्त आहेत. तसेच कार्यालयीन व्यवहार ठप्प होत आहेत. त्यामुळे तातडीने ही सेवा सुरळीत करावी, अशी मागणी ग्राहक करत आहेत.

शहरात बीएसएनलच्या कारभाराबद्दल असंतोष निर्माण झाला असून डिजिटल इंडिया ही घोषणा फोल ठरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ऑनलाईन फॉर्म भरणे आदी कामे खोळंबली आहेत. बँकांचे व्यवहार अधून मधून ठप्प होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना बँकेत हेलपाटे मारावे लागत आहेत. मोबाईल सेवा, नेट सेवा वारंवार विस्कळीत होते. परंतु दहा बारा दिवसांपासून ही सेवा ठप्प झाली आहे. शहरातील व्यापारीवर्गही बीएसएनएलचे ग्राहक आहेत. या ठप्प सेवेमुळे त्यांचा बाहेरील बाजारपेठेशी संपर्क होऊ शकत नसल्याचं चित्र आहे.

येथे बीएसएनएलचा मनोरा असून ऑपरेटरसाठी कार्यालय सुद्धा उपलब्ध आहे. परंतु या कार्यालयामध्ये कोणीही दिसून येत नाही. त्यामुळे येथे कायम स्वरुपी कर्मचारी राहणे गरजेचे असतानाही हे कार्यालय कुलुपबंद आहे. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रार निवारणाचीही अडचण होत आहे. ही सेवा त्वरित पूर्ववत करावी अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या