टेरर फंडिंगप्रकरणी हाफीज सईदला 15 वर्षांचा तुरुंगवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड क्रूरकर्मा दहशतवादी व जमात उद दवा या दहशतवा संघटनेचा म्होरक्या हाफीज सईद याला टेरर फंडिंगप्रकरणी न्यायालयाने 15 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. याआधी दोन वेळा हाफिज सईदला 11 व 10 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

हाफिज सईद याच्या डोक्यावर टेरर फंडिंगचे पाच गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी तीन गुन्ह्यांमध्ये मिळून त्याला 36 वर्षांची शिक्षा झालेली आहे. सध्या हाफिज सईद हा लाहोरमधील कोट लखपत तुरुंगात कैद आहे. पाकिस्तान जरी हा दावा करत असला तरी हाफिज सईद हा पाकिस्तानात मोकाट फिरत असल्याचे बोलले जात आहे.

मुंबईवरील हल्ल्याच्या गुह्यात अद्याप शिक्षा नाही

मुंबईवरील 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद आहे. सईदविरुद्ध अनेक पुरावे हिंदुस्थानने पाकिस्तान सरकारला दिलेले आहेत. पाक सरकारने आजवर केवळ चौकशीचे नाटक केले. 26/11च्या गुह्यात अद्याप हाफिज सईदला शिक्षा झालेली नाही.

अमेरिकेकडून 10 दशलक्ष डॉलर्सचे इनाम जाहीर

लष्कर-ए-तोयबा आणि जमात-उद-दवाचा म्होरक्या असलेला हाफिज सईदला ‘ग्लोबल टेररिस्ट’ म्हणून अमेरिकेने 2012 मध्ये जाहीर केले आहे. सईदची माहिती देणाऱयाला 10 दशलक्ष डॉलर्सचे इनामही अमेरिकेने जाहीर केले आहे. पाकिस्तानात मोकाट फिरणाऱया क्रूरकर्माचा पत्ता अद्याप पाक सरकारने अमेरिकेला दिलेला नाही.

हाफीज सईदसहीत पाच दहशतवाद्यांचे बँक खाते सुरू

पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबा आणि जमात-उद-दावा यासारख्या संघटनेत कार्यरत असलेल्या पाच दहशतवाद्यांच्या बँक खात्यांना पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. यात मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड हाफीज सईद याच्या बँक खात्याचादेखील समावेश आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (यूएनएससी) विशेष समितीने दिलेल्य परवानगीनंतर ही खाते सुरु करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे.