आळंदी परिसरात गारांचा पाऊस; कोयाळीत झाडावर वीज कोसळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोयाळी भानोबाची ( ता. खेड ) येथे झाडावर वीज कोसळून झाडाने पेट घेतला. दिघे भाडळे वस्ती येथेही झाडावर वीज कोसळली. या झाडाला यावेळी आग लागली. नागरिक, शेतकरी यांनी पावसाचं वातावरण असल्याने सुरक्षित राहण्यासाठी योग्य ठिकाणी सुरक्षित निवारा शोधावा, झाडाखाली उभे राहू नये. पावसाच्या काळात झाडाखाली कोणीही थांबू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

सायंकाळी पाचपासून आळंदी पंचक्रोशीत मोठ्या वादळी वाऱ्यासह विजा चमकल्या. यावेळी पावसाने जोर धरत परिसरात पाणीच पाणी केले. लहान गारा पडून पाऊस झाला. यावेळी कामगार, महिलांसह वाहनचालकांची मोठी तारांबळ झाली. वाहनचालक रस्त्याच्या दुतर्फा वळचणीला उभे राहून पाऊस कमी होत असल्याची वाट पाहताना ठिकठिकाणी दिसले. मिळेल त्या ठिकाणी वाहनचालकांनी निवारा गाठला. अनेक मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने रहदारीत वाहनांचे ये-जा करण्यामुळे अनेकांच्या अंगावर पाणी उडाले.

रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथ, पावसाळी नाली, क्षमतेपेक्षा जास्त पाणी आल्याने चेंबरवरून पाणी रस्त्यावर आले. मरकळ रस्ता, वडगाव चौक, हजेरी मारुती मंदिर आदी ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत होते. पावसाचे प्रमाण वाढल्याने काही वेळ वीजपुरवठा खंडित झाला होता. सुमारे 2 तास पावसाने आळंदी परिसरात हजेरी लावली. परिसरातील बालकांनी पावसात भिजून गारा गोळा करण्याचा आनंद घेतला.