
सामना प्रतिनिधी । निलंगा
निलंगा तालुक्यातील हाडोळी व परिसरातील गावात गुरुवारी संध्याकाळी वादळी वारे, पाऊस व गारपीटीने शेतकऱ्यांच्या नुकसानीत भर पडली आहे.
यावर्षी मृगाचा चांगला पाऊस झाला म्हणून पेरण्या वेळेवर झाल्या पण नंतर वेळेवर व पुरेसा पाऊस न पडल्याने मुग, उडीद व सोयाबीन शेंग लागण कमी झाली. उत्पादनात प्रचंड घट होत आहे म्हणून शेतकरी चिंताग्रस्त असतानाच ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी पाऊस पडल्यामुळे तालुक्यात सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. हाडोळी परीसरात वादळ वारे व गारपीटीसह पाऊस पडल्याने सोयाबीन शेंगा फुटुन शेतातच सडा पडला आहे. वादळी वा-याने उभा ऊस आडवा झाला आहे. शेतकरी सरकारी मदतीसाठी वाट पहात आहेत.































































