
सामना प्रतिनिधी । लातूर
अल्पसंख्यांक विकास विभागांतर्गत असलेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावेत. या समाजातील लोकांना त्यांच्यासाठी शासनाने केलेल्या प्रत्येक योजनांचा लाभ देऊन या समाजाला न्याय देण्याची प्रत्येक शासकीय विभागाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित अल्पसंख्यांक विकास विभागातंर्गत विविध योजनांच्या आढावा प्रसंगी शेख बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत ,पोलिस अधिक्षक राजेंद्र माने,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विपीन इटनकर,जिल्हा अल्पसंख्यांक कल्याण समितीचे सदस्य नजीम खान पठाण, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कोलगणे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संतोष आळसे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी शंकर बरुरे आदिसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अल्पसंख्यांक समाजाचा विकास म्हणजे संपूर्ण राज्याचा विकास आहे. राज्य अल्पसंख्यांक आयोगाकडून अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असून या कामात शासन ही पूर्णपणे पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अल्पसंख्यांक समाजातील लोकांना त्यांच्यासाठी असलेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला पाहीजे असे ही त्यांनी म्हटले.राज्य अल्पसंख्यांक आयोगाकडून प्रत्येक जिल्ह्यातील वक्फ बोर्डासाठी एक पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी लवकरच देण्यासाठी कार्यवाही सुरु आहे. त्यामुळे वक्फ बोर्डाचा कारभार अधिक गतीमान होणार आहे. तसेच वक्फ बोर्डाच्या जमीनीवर ज्या ठिकाणी अतीक्रमण झालेले आहे अथवा कोणीही बोर्डाच्या जमीनीच्या अनधीकृत कब्जा घेतला असेल अशा लोकांवर त्वरीत कठोर कारवाई जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाने करावी, अशी सूचना शेख यांनी केली. अल्पसंख्यांक विभागाच्या विविध योजनांसाठी जास्तीत जास्त निधी देणे तसेच समाजाच्या सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी आयोगाकडून राज्यशासनाकडे निधीची मागणी केली आहे. समाजाच्या सर्वांगीण सुधारणेबाबत प्रस्ताव पाठविण्यात येणार असून मुख्यमंत्री मदत करण्यासाठी सकारात्मक असल्याची माहिती त्यांनी दिली.
अल्पसंख्यांक विकासाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी प्रत्येक जिल्ह्यात व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे, तसेच सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनीही अल्पसंख्यांक समाजाच्या योजनाची माहिती समाजातील प्रत्येक गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहचवावी. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचाही गौरव केला जाईल असे शेख यांनी स्पष्ट करुन अल्पसंख्यांक विकास विभागात मुस्लीम ,जैन,पारसी,शिख,बौध आदि समाज असून या सर्व समाजातील लोकांचा सर्वांगीण विकासासाठी अल्पसंख्यांक आयोग प्रयत्नशील असल्याचे म्हणाले. लातूर येथे अल्पसंख्यांक समाजातील मुलांसाठी वस्तीगृह बांधण्यासाठी निधी मिळावा अथवा वक्फ बोर्डाची जमीन मिळावी अशी मागणी जिल्हाधिकरी श्रीकांत यांनी करुन दलीत वस्ती सुधार योजनेच्या धर्तीवर अल्पसंख्यांक बहूल भागाच्या पायाभूत विकासासाठी जिल्हा नियोजन समिती मधूनच बृहत योजना तयार करण्यासाठी आयोगाने पाठपुरावा करावा असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी कोलगणे यांनी अल्पसंख्यांक विकास विभागातर्गत असलेल्या केंद्र पुरस्कृत बहुक्षेत्र विकास कार्यक्रम, वसतिगृह बांधणे, उदगीर येथे मुलींसाठी उर्दू प्राथमिक विद्यालयाचे बांधकाम करणे, उदगीर येथे अल्पसंख्यांक समाजातील 100 मुलीसाठी वसतीगृह बांधणे,अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्रात मुलभूत पायाभूत सुविधा ,पंतप्रधान यांचा 15 कलमी कार्यक्रम आदी येाजनांची सद्यस्थिती व निधीची माहिती पॉवर पॉईंटव्दारे दिली. तसेच मौलाना आझाद महामंडळातर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहितीही देण्यात आली.






























































