इस्रायली नागरिकांना घाबरवण्यासाठी हमास दहशतवाद्यांनी पुरुषांवरही केले लैंगिक अत्याचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये 7 ऑक्टोबर रोजी हल्ला केला. अचानकपणे अंधाधुंद गोळीबार करत 1200हून अधिक लोकांना त्यांनी ठार मारलं आणि घरात घुसून सुमारे 240 लोकांचं अपहरण केलं. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, हमास दहशतवाद्यांनी महिलांवर बलात्कार केले. या हल्ल्याचा तपास करणाऱ्या इस्रायल पोलिसांना असे काही पुरावे मिळाले आहेत, त्यांवरून हमासने पुरुषांवरही लैंगिक अत्याचार केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तपासात आढळलेल्या काही पुराव्यांच्या आधारे पुरुषांवरील लैंगिक अत्याचाराची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या महिलांवर बलात्कार केले आणि लैंगिक अत्याचारही केले. महिलांसोबत पुरुषांवरही लैंगिक अत्याचार केल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. तसंच, या हल्ल्यातून निसटलेल्यांपैकी अनेकांनी पुरुषांवर अत्याचार झाल्याची साक्ष दिली आहे.

हमासचे दहशतवादी फक्त लोकांना संपवत नव्हते तर त्यांची मानखंडनाही करत होते. हत्येपूर्वी आणि नंतर मृतदेहाची विटंबना करून त्यांनी नागरिकांचा अपमान केला. यात लैंगिक हिंसेचा सर्वात मोठा भाग आहे, अशी माहिती लैंगिक हिंसेतून बचावलेल्या नागरिकांच्या संघटनेचा प्रमुख येल शेरर यांनी दिली आहे.