
जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपल्या अपंगत्वाच्या व्यंगाचा कधीही बाहू न करता मंडणगड विन्हे येथील रूपेश पवार या युवकाने गावालाच नव्हे तर मंडणगड आणि दापोली तालुक्यांतील शेतकऱ्यांना आपल्या कृतीचा आर्दश घालून दिला आहे. एका दिव्यांगाने घालून दिलेल्या श्रमाच्या आर्दशाचे जेव्हा इतरही धडधाकट कित्ता गिरवतील तेव्हाच खऱ्या अर्थाने शेती करणाऱ्या अथवा शेती संबंधित कुटीरोद्योग करणाऱ्यांना समृध्दी आणि सुखी जीवन जगण्याचे बळ मिळेल असे वाटते.
घरची आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या रूपेश पवार ने दहावी झाल्यानंर नोकरीच्या मागे न लागता गावातील तसेच मित्र परिवारांकडून उसनवारी घेऊन राहत्या घरातच एक छोटे खाऊ बिस्किट गोळ्यांचे दुकान सुरू केले. मात्र मित्र परिवारांकडून घेतलेली उसनवारी होणाऱ्या धंद्यातून देणे शक्य होत नव्हती. त्यामुळे वडिलोपार्जित साडेतीन एकर शेतीमध्ये भाजीचा मळा करण्याचे धाडस केले. या वडिलोपार्जित शेतीमध्ये रूपेशने माठ, मुळा, कोंथबिर, पालक, पडवळ, दुधी, भेंडी, मिरची आणि टॉमेटो आदी प्रकारच्या भाजीचा मळा फुलविला, तर पिवळ्या आणि केशरी रंगाच्या झेंडूच्या फुलांनी अवघे शिवार बहरून टाकले. इतकेच नव्हे तर कलिंगडाचे पिकही घेतले. चार पैसे गाठीशी आल्यावर हुरूप वाढला आणि त्याने 2 मुरा जातीच्या म्हशी आणि दोन गावठी गायी घेतल्या. कारण रूपेशचे सेंद्रिय शेतीला प्राधान्य होते. या गायी म्हशींच्या शेणाचे खत म्हणून जसा उपयोग होत होता, तसं त्याने दूध, दही आणि तुपाचा व्यवसायही केला. त्यालाही बरकत येत गेली.
त्यानंतर त्याने भाजीपाल्याच्या मळ्यासाठी म्हणून लागणाऱ्या खतासाठी शेळी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने शेळी पाळणाचे दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून प्रशिक्षणही घेतले. हे प्रशिक्षण घेतल्यानंतर कोकण कृषी विदयापीठाने विकसित केलेल्या कोकण कन्याळ शेळींचा गोट फार्म करण्यासाठी शेळयांच्या युनिटची मागणीही केली. मात्र विद्यापीठाकडून पदरी निराशाच पडली. पण माघार घेईल तो रूपेश नव्हे. त्याने गावठी बकऱ्या विकत घेतल्या. काही अर्धेल घेतल्या आणि शेळी पाळणाचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर 5 शेळ्या आणि एक बोकड मिळाला. मात्र आज रूपेशकडे 22 शेळ्या आहेत. त्यातून तो आपल्या उदरनिर्वाह करत आहे. रूपेशच्या या यशाची दखल घेऊन सामाजिक संस्थाकडून त्याचा वेळोवेळी सन्मान करण्यात आला आहे.

























































