
संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या निर्भया प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. अर्थात अद्याप अंतिम तारीख कोणती असावी याचा निर्णय झालेला नाही. पण, लवकरात लवकर त्यांना फाशी दिली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण, फाशीची प्रक्रिया नेमकी कशी असते, ठाऊक आहे का ?
फाशीची प्रक्रिया नेमकी कशी असते, फाशी देतेवेळी तिथे कोण कोण उपस्थित असतं, नेमके काय नियम असतात याबाबत सामान्यांना विशेष माहिती नसते. कुणालाही जेव्हा फाशीची शिक्षा देण्यात येते तेव्हा त्याआधी न्यायालय एक ब्लॅक वॉरंट जारी करतं. त्या ब्लॅक वॉरंटमध्ये ज्या तुरुंगात फाशी देण्यात येणार आहे, त्याच्या कारागृह अधीक्षकाकरवी फाशीची वेळ ठरवून मग नमूद केली जाते.
ब्लॅक वॉरंट जारी केल्यानंतर 15 दिवसांनी फाशी दिली जाते. वॉरंट जारी झाल्यानंतर विनाविलंब फाशीची तयारी केली जाते. ब्लॅक वॉरंट जारी झाल्यानंतर कारागृह अधीक्षक सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आणि पोलीस महासंचालक यांना फाशीची वेळ सांगतो. फाशीच्या दिवशी काही गडबड होऊ नये किंवा एकंदरीत गंभीर वातावरण असल्याने उर्वरित सर्व कैद्यांना प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांच्या बरॅकमध्येच बंदिस्त ठेवलं जातं.
प्रत्यक्ष फाशीच्या वेळी गुन्हेगारासोबत कारागृह अधीक्षक, उपअधीक्षक, आरएमओ (निवासी वैद्यकीय अधिकारी), वैद्यकीय तज्ज्ञ अर्थात डॉक्टर, जिल्हा मॅजिस्ट्रेट हे पाच जण उपस्थित असतात. त्याखेरीज फाशी होत असलेल्या गुन्हेगाराने जर त्याच्या धर्मातील गुरुंच्या उपस्थितीची इच्छा दर्शवली. उदा. पंडित किंवा मौलवी इत्यादी. तर तेही फाशी होतेवेळी उपस्थित राहू शकतात.

























































