हणमंतगाव दरोड्यातील दोन सराईत गुन्हेगार गजाआड लोणी पोलिसांची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

राहाता तालुक्यातील हणमंतगाव येथे घरफोडी करून 1 लाख 65 हजारांचा मुद्देमाल व रोख रक्कम चोरून नेणाऱ्या दोघांना लोणी पोलिसांनी चार दिवसांत गजाआड केले आहे. त्यांच्याकडून दुचाकी व 43 लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.

विजय गेनू ब्राह्मणे (39, रा, हणमंतगाव) व शिवाजी अंगद पवार (48, रा. लोणी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी बाबासाहेब रघुनाथ ब्राह्मणे (रा. हणमंतगाव) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

हणमंतगाव येथील फिर्यादीच्या नातेवाईकांच्या लग्नानिमित्त 28 मार्च रोजी सर्वजण सोनगाव येथे गेले होते. याचवेळी वरील दोन्ही आरोपींनी कडी-कोयंडा तोडून कपाटातील 1 लाख 43 हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असा 1 लाख 65 हजारांचा मुद्देमाल लांबविला होता. लोणी पोलिसांनी अवघ्या पाच दिवसांत तपासाची चक्रे फिरवीत आरोपी विजय गेनू ब्राह्मणे याला ताब्यात घेतले. त्याने शिवाजी पवार या आणखी एका साथीदाराची माहिती दिली. त्यालाही पोलिसांनी अटक केली.

दोघांनीही गुह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून दुचाकी आणि 43 हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम आरोपींनी ज्यांना दिली त्यांनाही आरोपी करण्यात आले आहे.