
भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाला मोठा अपघात झाला असून या अपघातात दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला आहे. विनोद झाडे आणि फलजी भाई पटेल अशी मृत सुरक्षा जवानांची नावे आहेत. झाडे हे पोलिस विभागाचे तर पटेल हे सीआरपीएफचे जवान असल्याची माहिती पोलीस सूत्रांने दिली आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हंसराज अहिर हे आज सकाळी ताफ्यासह चंद्रपूर येथून नागपूर विमानतळावर दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाले होते, तेव्हा हा अपघात घडला.
महामार्गावरून जात असताना वर्धा जिह्यातील जाम चौरस्त्याजवळ कांडळी नदी पार केल्यावर हा अपघात झाला. अहिर बसून असलेले वाहन पुढे गेल्यावर अचानक जनावर आडवे आल्याने पुढचा कंटेनर अनियंत्रित झाला. यामागचे सुरक्षा वाहन भरधाव वेगातील कंटेनरला धडकले. यात दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर बनवारीलाल रेंगर, विजयकुमार साजिद मोहम्मद, एस. प्रकाश, दीपककुमार हे गंभीर जखमी झाले.





























































