एकटेपणा…आनंददायी!

97

सामना ऑनलाईन । मुंबई

एकटेपणा… एकटी मुलगी, एकटी स्त्री, उगीच तथाकथित संस्कृतीरक्षकांची विचार करण्याची दृष्टीच बदलते. पण बऱयाचदा हा एकटेपणा ‘ती’च्यासाठी मात्र जाम मजेशीर ठरतो. स्वत:साठी जगायला प्रत्येकालाच आवडते. विशेषत: स्त्रियांना तर अशी संधी फार कमी वेळा मिळते…

जुन्या मित्र-मैत्रिणींशी बोला
घरी असल्यावर बऱ्याचदा काय करावे कळत नाही. घरात कोणीच नसले की घर खायला उठते. अशावेळी वेळ घालवायचा असेल तर ज्याच्यासोबत बरेच महिने वर्ष बोलला नाहीत अशा जुन्या मित्र-मैत्रिणींना फोन करुन गप्पा मारा. दोघंही बऱयाच काळाने फोनवर बोलत असल्याने दोघांकडे बोलायला बरेच विषय असतात. शिवाय जुन्या आठवणींना एकदा उजाळा मिळेल आणि ताजेतवाने झाल्यासारखे वाटेल. त्यामुळे जुन्या मित्र-मैत्रिणींशी बोला.

पाऊस आणि कॉफी
पावसाचे दिवस असल्याने घरात एकटे असताना खिडकीपाशी बसून पावसाचा आनंद घ्या. त्यासोबत गरमागरम कॉफी असेल तर क्या बात है… एवढेच नाही तुम्ही गरमा गरम भजीही खाऊन आनंद घेऊ शकता. त्याचे समाधान थोडे वेगळेच असते.

वेगवेगळे कपडे घालून पहा
वॉर्डरोबमध्ये असलेले कपडे घालून फोटो काढायचा, छानपैकी मेकअप करायचा, हवे ते कपडे घालायचे आणि सेल्फी काढायचे. त्यावेळेत आईच्या वॉडरोबमधली साडी बाहेर काढून ती नेसून पाहायची. वेळही जातो आणि उत्साह वाढतो.

पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवा
पाळीव प्राणी सोबत असताना एकटं वाटणारच नाही. त्यांच्यासोबत अनेक गोष्टी शेअर करुन मनमोकळे करू शकतो. त्यांना गोंजारणे, त्यांच्यासोबत लहान होऊन खेळते यातूनही एक वेगळा आनंद मिळतो.

नृत्य करा
बऱयाचदा काहीजणींना नृत्याची आवड असते, पण ती आवड मर्यादितच राहते. पण घरी कुणी नसताना संगीताच्या तालावर मनसोक्त थिरकू शकाल. त्यामुळे हौसही पूर्ण होईल आणि आपण चांगले नाचू शकतो असा आत्मविश्वासही येईल.

जेवणाचा आनंद घ्या
बऱ्याचदा घरचे काम आवरणे किंवा कामावर जायची घाई असल्याने निवांत बसून खाणे होतच नाही. अशावेळी ही वेळ असते जेव्हा तुम्ही खुर्चीवर बसून आवडता चित्रपट, मालिका बघत जेवणाचा आनंद घेता येतो. घरात कुणीही नसताना दुसरा उत्तम टाइमपास म्हणजे वेगवेगळ्या रेसिपीजचा प्रयोग करणे. आपल्याला हव्या ते पदार्थ बनवून बघता येतात. पदार्थ फसला तर आपल्यामुळे कुणी उपाशी राहील याचे दडपण नसते. आपणच केलेले असल्यामुळे कुणाला नाव ठेवायलाही जागा नसेल. हवं ते खाता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या