IPL – हरभजनचा चेन्नई सुपरकिंग्जसोबतचा करार संपला, स्वत: ट्विट करून दिली माहिती

आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळणारा अनुभवी गोलंदाज हरभजन सिंग याचा संघासोबतचा करार संपला आहे. हरभजननं स्वत: ट्विट करत हा करार संपल्याचं जाहीर केलं आहे. 2018 मध्ये हरभजन व चेन्नई सुपरकिग्जमध्ये तन वर्षांच्या करार झाला होता.

‘चेन्नईच्या संघासोबतचा माझा करार संपला आहे. या संघासाठी खेळणं हा कायम अविस्मरणीय आणि जबरदस्त अनुभव होता. बऱ्याच सुंदर आठवणी, चांगले मित्र मी या काळात बनवले आहेत. जे पुढिल अनेक वर्ष स्मरणात राहतील. या 2 वर्षांच्या अदभूत काळासाठी मी चेन्नई सुपरकिंग्जच्या प्रशासनाचे, कर्मचाऱ्यांचे तसेच चाहत्यांचे आभार मानतो’, असे ट्विट हरभजन सिंग याने केले आहे.

यंदाच्या आयपीएल सिझनमध्ये हरभजन सिंग काही वैयक्तिक कारणास्तव खेळू शकला नव्हता. हरभजनने आतापर्यंत आयपीएलचे 160 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 26.44 च्या सरासरीने 150 विकेट घेतल्या आहेत.

आयपीएलच्या सुरुवातीपासून मुंबई इंडियन्ससाठी खेळलेल्या हरभजन सिंगला 2018 मध्ये चेन्नई सुपरकिंग्जने विकत घेतले होते. हरभजनसाठी चेन्नईने तब्बल 2 कोटींची बोली लावली होती. त्यानंतर 2018 व 2019 ची आयपीएल तो खेळला मात्र 2020 ला त्याला काही खासगी कारणास्तव आयपीएलमधून माघार घ्यावी लागली.

आपली प्रतिक्रिया द्या