
आयसीसी टी-20 वर्ल्ड कप जसजसा जवळ येतोय तसतसे चर्चांना उधाण येऊ लागले आहे. कोण विजेता ठरणार, कोण घसरून पडणार आणि कोण धक्कादायक खेळ करणार या सगळय़ाच प्रश्नांवर चर्चा रंगू लागल्या आहेत. अशाच वातावरणात हिंदुस्थानच्या क्रिकेटविश्वातील फिरकीवीर हरभजन सिंगने घरच्या मैदानावर हिंदुस्थानच टी-20 वर्ल्ड कपचे जगज्जेतेपद राखणार, असा भाकितांचा यॉर्कर टाकला आहे.
‘लिजंड्स 90’च्या रिलीजदरम्यान माध्यमांशी बोलताना भज्जीने कुठलेही आढेवेढे न घेता थेट सांगितले, हिंदुस्थानच पुन्हा एकदा टी-20 विश्वविजेता ठरणार! भविष्यकथन करताना हरभजन इथेच थांबला नाही. त्याने थेट सेमीफायनलमध्ये पोहोचणाऱया चार संघांची नावेही जाहीर केली आणि क्रिकेटविश्वाला एक प्रकारे धक्का दिला. हिंदुस्थानसह दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि डार्क हॉर्स अफगाणिस्तान उपांत्य फेरीत धडक मारतील, अशी भविष्यवाणी केली आहे.
भज्जी पुढे म्हणाला की, हिंदुस्थानकडे किताब राखण्याची पूर्ण ताकद आहे. अनुभव, संतुलित संघरचना आणि दबावात कामगिरी करण्याची सवय, हे सर्वगुण हिंदुस्थानला इतरांपेक्षा वेगळे ठरवतात. तसेच ऑस्ट्रेलियाच या स्पर्धेतील सर्वात धोकादायक संघ असेल. मोठया स्पर्धांमध्ये दबावाखालीही ऑस्ट्रेलिया कसं खेळतं, हे जगाने अनेकदा पाहिलं आहे.
अफगाणिस्तान फिरकीच्या बळावर उपांत्य फेरीत?
हरभजनच्या भाकितामध्ये अफगाणिस्तान हे धाव भुवया उंचावणारे ठरले आहे. भज्जीच्या मते, अफगाणिस्तानची मजबूत फिरकी टी-20
फॉरमॅटमध्ये कोणत्याही संघाला गुडघ्यावर बसवू शकते. त्यामुळे त्यांना सेमीफायनलचा प्रबळ दावेदार मानले पाहिजे. मात्र एक मोठा धक्का म्हणजे इंग्लंडचे नाव उपांत्य फेरीच्या नावात नाही.
हिंदुस्थानचे टी-20 वर्ल्ड कप सामने
7 फेब्रुवारीः हिंदुस्थान-अमेरिका
12 फेब्रुवारीः हिंदुस्थान-नामिबिया
15फेब्रुवारीः हिंदुस्थान – पाकिस्तान (कोलंबो)
18फेब्रुवारी ः हिंदुस्थान-नेदरलँड्स
(सर्व सामने सायंकाळी 7 वाजता)
वर्ल्ड कपची गटवारी
गट ‘अ’ –ः हिंदुस्थान, पाकिस्तान, अमेरिका, नामिबिया, नेदरलँड्स.
गट ‘ब’ – ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, आयर्लंड, ओमान.
गट ‘क’ – इंग्लंड, वेस्ट इंडीज, इटली, बांगलादेश, नेपाळ.
गट ‘ड’- दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, यूएई, पॅनडा.




























































