17 वर्षांनंतर कानशिलातला आवाज पुन्हा घुमला! हरभजनने श्रीसंतच्या कानाखाली मारल्याचा जुना व्हिडीओ तुफान व्हायरल

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून डंका वाजवणाऱया आयपीएलमध्ये वादांचा धडाका काही नवीन नाही, मात्र त्यातला सर्वात गाजलेला वाद म्हणजे हरभजन सिंगने श्रीसंतच्या कानाखाली वाजवल्याचा प्रसंग! या घटनेला तब्बल 17 वर्षांचा काळ उलटून गेला असताना आता अचानक तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

2008 च्या आयपीएलच्या पहिल्या पर्वातील मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्यानंतर हरभजनने रागाच्या भरात श्रीसंतला कानशिलात लगावली होती. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर क्रिकेटविश्वात खळबळ उडाली होती. परिणामी हरभजनवर आयपीएलमध्ये बंदी घालण्यात आली होती, तर एकदिवसीय क्रिकेटमध्येही पाच सामन्यांचा निर्बंध बसला होता. नंतर हरभजनने आपली चूक मान्य करत अनेकदा पश्चाताप व्यक्त केला.

मात्र, आता आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी या घटनेचा व्हिडीओ समोर आणला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कच्या बियॉन्ड 23 क्रिकेट पॉडकास्टमध्ये ललित मोदींनी नेमके काय घडले होते ते उघड केले. ते म्हणाले, सामना संपल्यानंतर पॅमेरे बंद होते, पण माझा सिक्युरिटी पॅमेरा सुरू होता. त्यात दिसते की खेळाडू हस्तांदोलन करत असताना हरभजन श्रीसंतजवळ आला आणि त्याला उलटय़ा हाताने कानशिलात लगावली. श्रीसंतला क्षणभर काय घडलं ते कळलंच नाही. मग मध्येच इरफान पठाण आणि महेला जयवर्धने आले.

हरभजनने मात्र नेहमीच या प्रसंगाला आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक मानली आहे. आयुष्यातून एखादी गोष्ट पुसता आली असती तर ही घटना पुसली असती, असं तो म्हणतो. एवढंच नव्हे तर श्रीसंतची मुलगी एकदा म्हणाली होती, मी तुझ्याशी बोलणार नाही, तू माझ्या बाबांना मारलं होतंस. हे ऐकून हरभजनच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते.