नटवर सिंगसाठी घेतली मेहनत

छोटय़ा पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ पुन्हा एकदा एका नवीन पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.  मालिकेत प्रेक्षकांना अजितकुमार देव म्हणजे अभिनेता किरण गायकवाड एका वेगळ्या रूपात पाहायला मिळतोय. नटवर सिंग जो राजस्थानमधून आता गावात आला आहे, तो नक्की देवमाणूस आहे का, असा प्रश्न इतके दिवस प्रेक्षकांना पडत होता, पण त्याचं उत्तरदेखील मिळालं. नटवर सिंग हाच देवमाणूस आहे हे नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं.

नटवर सिंगच्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतल्याचे किरण गायकवाड सांगतो. किरण म्हणाला, जेव्हा मला समजलं की नटवर सिंग हा राजस्थानमधला हातचलाखी करणारा माणूस आहे, तेव्हा मी त्या ट्रिक्स शिकलो. जादूचे प्रयोग करण्याच्या टीप्स जाणून घेतल्या. राजस्थानी भाषेचं प्रशिक्षण घेतलं. आम्ही राजस्थानमध्ये शूटिंग सुरू केलं तेव्हा त्याच्या एक दिवस आधी मी तिथे मार्केटमध्ये फिरत होतो. तिथे मी लोकांचं निरीक्षण करत होतो. त्यांचा लहेजा आत्मसात करण्याचा प्रयत्न करत होतो.