ऑनलाइन अध्यापनासाठी घेतलेली मेहनत ‘रयत’च्या लौकिकाला साजेशी, संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांचे प्रतिपादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगाकर मोठे संकट आले आहे. अशा कालखंडात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी गेली दोन वर्षे ऑनलाइन अध्यापनासाठी मेहनत घेतली ही गोष्ट रयत शिक्षण संस्थेच्या शंभर वर्षांच्या लौकिकाला साजेशी असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाइन कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील होते. संस्थेचे व्हाईस चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, मॅनेजिंग कौन्सिलचे इतर सर्व मान्यवर सदस्य, जनरल बॉडी सदस्य, लाइफ मेंबर, लाइफ वर्कर कार्यकर्ते, रयत सेवक आणि विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

शरद पवार म्हणाले, कोरोनासारख्या विषाणूमुळे जगामध्ये सर्वच क्षेत्रात एक प्रकारची नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. अशा कालखंडात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप, अॅण्ड्रॉइड मोबाईल यांसारख्या साधनांची कमतरता असतानाही रयतने ‘रोझ’सारखा प्रकल्प राबवून शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या 70 टक्के विद्यार्थ्यांपर्यंत हे शिक्षण ऑनलाइनच्या माध्यमातून आपण पोहोचवू शकलो, ही समाधानाची बाब आहेच. तथापि, केवळ आर्थिक परिस्थिती नाही म्हणून डोंगरदऱ्यात आणि आदिवासी भागात राहणारे सुमारे 30 टक्के विद्यार्थी इंटरनेटच्या तसेच अॅण्ड्राइड फोनच्या अभावामुळे या शिक्षणापासून दूर राहिले. ही तफावत दूर करण्यासाठी भविष्यात अत्यंत जोमाने काम करावे लागेल, रयत शिक्षण संस्था ही जबाबदारी पार पाडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दिवंगत गणपतराव देशमुख यांना ‘कर्मवीर’ पुरस्कार

कर्मवीर जयंतीच्या ऑनलाइन कार्यक्रमाचे औचित्य साधून दिला जाणारा ‘पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार’ दिवंगत गणपतराव देशमुख यांना, तर ‘रयत माउली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार’ नगर जिह्यातील बीजमाता राहिबाई पोपेरे यांना जाहीर करण्यात आला. अडीच लाख रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.