
आतापर्यंत खूप संघ बदललेस, मात्र आता करीअरच्या शेवटपर्यंत मुंबई इंडियनमध्येच राहा, असा प्रेमळ सल्ला मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंडय़ाने 13 वर्षांचा सलामीहारचा काळा डाग पुसून काढणाऱ्या शार्दुल ठाकूरला दिला आणि त्यानेही, मी दीर्घकाळ मुंबई इंडियन्ससाठी खेळू शकलो तर हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण असेल, अशी उत्स्फूर्त दाद दिली.
काल मुंबईच्या 13 वर्षांच्या पराभवाचा दुष्काळ संपवणाऱ्या शार्दुलच्या गोलंदाजीचे हार्दिकने मनापासून कौतुक केले. कोलकाताविरुद्धच्या सामन्यात 444 धावांचा पाऊस पडत असताना शार्दुलने 39 धावांत 3 विकेट घेत भेदक गोलंदाजी केली. मुंबई इंडियन्ससाठीच नेट बॉलर म्हणून सुरू झालेला त्याचा प्रवास आज ‘मॅच विनर’ बनून पूर्ण झाला. आज मुंबई इंडियन्ससाठी पदार्पण करताना ठाकूरच्या गोलंदाजीच्या शोलेंनी कोलकात्याला होरपळून टाकले.
कोलकात्याने 6 षटकांत 68 धावा ठोकल्या होत्या. सामना हातातून निसटतोय असं वाटत असतानाच हार्दिकने शार्दुलवर विश्वास टाकला आणि शार्दुलने लगेचच फिन अॅलनची विकेट घेत सामना फिरवला. मला आव्हाने आवडतात, असं सांगत त्याने दबावाखाली आपली चमक दाखवली.
‘हेच माझं घर’
वानखेडेवर नेट बॉलर म्हणून घाम गाळणारा शार्दुल आज त्याच मैदानावर हीरो ठरला. ‘मुंबईसाठी खेळणं हे स्वप्न होतं,’ असं म्हणताना त्याच्या आवाजात भावना दाटून आल्या. हार्दिकच्या विश्वासाला उत्तर देताना तो म्हणाला, इथेच राहायला मिळालं तर याहून मोठं काही नाही. हे माझेच घर असल्याची कबुलीही त्याने दिली.




























































