हार्दिक पटेल यांनी व्यक्त केली शेवटची इच्छा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल 25 ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. उपोषणाच्या नवव्या दिवशी रविवारी त्यांनी मृत्युपत्र जारी केले आहे. आपली संपत्तीचे वाटप आई उषा पटेल, वडील भरत पटेल आणि एक गोशाळा यांच्यामध्ये करण्यात यावे असे त्यांनी म्हटले आहे. पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी आणि त्यांचे सहकारी अल्पेश कठीरिया यांची मुक्तता करण्यात यावी या मागणीसाठी हार्दिक यांनी 25 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

निर्दयी भाजप सरकारविरोधात आपण 25 ऑगस्टपासून उपोषण करत आहोत. त्यामुळे माझे शरीर अशक्त झाले आहे. आजार आणि संक्रमणामुळे शरीरातील वेदना वाढत आहेत. त्यामुळे आता शरीरावर माझा विश्वास राहिलेला नाही. शरीरातून माझा आत्मा कधीही बाहेर पडेल, असे मला वाटत असल्याने मी मृत्युपत्र करून संपत्तीचे वाटप आणि माझी शेवटची इच्छा व्यक्त केली आहे. आपला मृत्यू झाल्यास नेत्रदान करण्यात यावे असेही त्यांनी मृत्युपत्रात म्हटले आहे. पाटीदार समाजाचे नेते मनोज पानेरा यांनी हार्दिक यांच्या मृत्युपत्राबाबत माहिती दिली. हार्दिक यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या बँक खात्यातील 50 हजार रुपयांतील 20 हजार रुपये आईवडिलांना तर 30 हजार रुपये अहमदाबादमधील विरमगाममधूल पुश्नैती गावातील एका गोशाळेला देण्यात येतील असे ते म्हणाले. ‘हू टूक माय जॉब’ या त्यांच्या पुस्तकाची 30 टक्के रॉयल्टी आई-वडील आणि बहिणीला देण्यात यावी तर 2015 मध्ये पाटीदार समाजाच्या आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या 14 तरुणांच्या कटुंबीयांना 70 टक्के रॉयल्टी देण्यात यावी असे त्यांनी म्हटले आहे. हे पुस्तक अजून प्रकाशित झालेले नाही. हार्दिक यांच्या नावावर एक इन्शुरन्स पॉलिसी आणि एक वाहन आहे.

हार्दिक यांना भेटण्यासाठी आलेल्या समर्थकांना अनेक तास ताटकळत राहावे लागले. पोलीस प्रत्यकाचे ओळखपत्र तपासून त्यांचे मोबाईल क्रमांक लिहून त्यांना प्रवेश देत होते. त्यामुळे समर्थक ताटकळत होते. यावेळी काही समर्थकांनी याचा विरोध केल्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. आपल्या समर्थकांवर बळाचा वापर होत असेल, त्यांना मारहाण करून अटक करण्यात येत असेल तर आपण वैद्यकीय तपासणी करणार नाही आणि डॉक्टरांच्या पथकाला रक्त आणि लघवी तपासणीसाठी देणार नसल्याचे हार्दिक यांनी या घटनेनंतर सांगितले. हार्दिक यांच्या या घोषणेनंतर तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांना समर्थकांनी परत पाठवले.