BUDGET 2019 पालिकेच्या शाळांमध्ये हार्डवेअर, सॉफ्टवेअरचे अभ्यासक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

पालिकेच्या शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम, टॅबमधून अभ्यासक्रम आणि दर्जेदार शिक्षण दिले जात असताना आता हार्डवेअर-सॉफ्टवेअरचे अभ्यासक्रम, भाषा प्रयोगशाळा, विज्ञान कुतूहल भवन आणि संगीत-क्रीडा अकादमीदेखील सुरू केल्या जाणार आहेत. यामुळे पालिकेच्या शाळा डिजिटल होणार आहेत. पालिकेचे महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेला 2733.77 कोटींचा अर्थसंकल्प आज अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांना सादर केला.

शिक्षण विभागासाठी अनेक नवीन उपक्रम असलेला अर्थसंकल्प आज मांडण्यात आला. या नवीन उपक्रमांमुळे अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत 164.42 कोटींची वाढ झाली आहे. यामध्ये पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना हार्डवेअर, सॉफ्टवेअरबरोबरच थ्रीडी डिझाईन आणि प्रिंटिंग,  इलेक्ट्रॉनिक रोबोट, मोबाईल ऍप बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. याशिवाय ई-लर्निंग, डिजिटल क्लासरूम,  टॉय लायब्ररी व नकीन बालवाडय़ा, मिनी सायन्स सेंटर्स, डेस्क व बेंचेस, व्हर्चुअल क्लासरूम,  दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. यावेळी नगरसेविका स्नेहल आंबेकर, शीतल म्हात्रे, नगरसेवक साईनाथ दुर्गे, सचिन पडवळ, अंजली नाईक, राहुल कनाल, शिक्षणाधिकारी महेश पालकर, उपायुक्त मिलीन सावंत आदी उपस्थित होते.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा वाढणार

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी शिवसेनेच्या माध्यमातून शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे यांनी केली होती. यासाठी राहुल कनाल यांनीदेखील पाठपुरावा केला. या उपक्रमासाठी अर्थसंकल्पात 24.30 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय शिवसेनेच्या मागणीनुसारच शाळांचा कारभार आणि विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सेवासुविधा, गुणवत्तेची तपासणी ‘नाबेट’ या त्रयस्थ संस्थेकडून केली जाणार आहे. यामुळे शाळांच्या मनमानीला चाप बसणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकही नेमण्यात येणार आहेत. यासाठी एक कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय शाळांसाठी 2.60 कोटी

आंतरराष्ट्रीय शैक्षणिक मंडळाच्या संलग्नतेसाठी पालिकेच्या शाळांची नोंदणी झाली आहे. या कर्षापासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा सुरू होणार आहेत आणि त्यासाठी पालिका 2.60 कोटी रुपये खर्च करणार आहे. इयत्ता पाचवी ते आठकीच्या किद्यार्थ्यांकरिता भाषा प्रयोगशाळेची उभारणी करणार आहे. याकर 1.30 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.

विद्यार्थ्यांना मिळणार व्यावसायिक शिक्षण

पालिकेच्या पाचवी ते आठवीच्या विध्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या 208 संगणक प्रयोगशाळांचा वापर करून ‘टिंकर लॅब’ सुरू करण्यात येणार आहेत. या टिंकर लॅबमध्ये एखादी वस्तू किंवा प्रतिमेच्या माध्यमातून  तिला हवा तसा आकार, रूप देऊन त्यांची त्रिमिती प्रतिकृती बनविण्यात येणार आहे. यामध्ये स्क्रॅच प्रोग्रॅमिंग, आर्डिनो प्रोग्रॅमिंगच्या वापरासह थ्रीडी डिझायनिंग आणि प्रिंटिंग इलेट्रॉनिक रोबोट बनविणे, मोबाईल ऍप विकसित करणे इत्यादी सुविधा उपलब्ध होतील. या टिंकर लॅबसाठी बजेटमध्ये 1.42 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

मुलांना वार्षिक पेंग्विन दर्शन

शिवसेनेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील पेंग्विन पाहण्यासाठी दरवर्षी पालिकेच्या विद्यार्थ्यांची वार्षिक सहल राणीच्या बागेत नेली जाणार आहे.

पालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन आणि महत्त्वाकांक्षी उपक्रम असल्यामुळे हा अर्थसंकल्प निश्चितच विकासाच्या दिशेने नेणारा आहे. यातील अनेक उपक्रमांमुळे पालिका शाळांकडे विद्यार्थ्यांचे आकर्षण वाढेल- मंगेश सातमकर, अध्यक्ष, शिक्षण समिती

ई-गव्हर्नंस

पालिका शाळांतील व कार्यालयांतील कामकाज अधिक कार्यक्षमपणे आणि कागदविरहीत करण्यासाठी पालिकेने माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ई-गव्हर्नंस सुरू करण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये पालिकेच्या संकेतस्थळावर शिक्षण विभागाची आवश्यक माहिती अपलोड करण्यात आली आहे. याद्वारे पालकांच्या व नागरिकांच्या हरकती, सूचनांची त्वरित दखल घेतली जाणार आहे. या पोर्टलवर खासगी, अनुदानित, विनाअनुदानित व बालवाडी या सर्व शाळांची माहिती पाहणे सोयिस्कर होणार आहे.

अशी आहे तरतूद

  • सीसीटीव्ही कॅमेरा  24.30 कोटी
  • ई लर्निंग 1.30 कोटी
  • डिजिटल क्लासरूम 8 कोटी 24 लाख
  • टॉय लायब्ररी व नवीन बालवाडीसाठी  7 कोटी 38 लाख
  • शाळांचे मूल्यमापन 20 लाख
  • स्टेशनरी वस्तूंची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँकेत जमा होणार 19.69 कोटींची तरतूद
  • खेळांची साधने 2 कोटी, विज्ञान कुतूहल भवन 1.20कोटी
  • जलद इंटरनेटसह नकीन दूरध्वनी जोडणी 35 लाख
  • शाळा माहिती व्यवस्थापन नियंत्रण 80 लाख
  • मिनी सायन्स सेंटर्स  66 लाख
  • डेस्क व बेंचसाठी  9 कोटी 87 लाख
  • शालेय इमारतींच्या दुरुस्तीसाठी 201.73 कोटी
  • व्हर्चुअल क्लासरूमकरिता 16.92 कोटी
  • दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 3 कोटी
  • नवीन रस्ते-पूल, मार्गांची दुरुस्ती
  • मुंबईकरांचा प्रवास वेगवान-सुखकर होणार
  • 1520.09 कोटींची तरतूद

पालिकेच्या अर्थसंकल्पात नवीन रस्ते-पूल बांधण्यात येणार असून मार्गांच्या दुरुस्तीसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या कामांसाठी 1520.09 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास वेगवान आणि सुखकर होणार आहे.

2019-20च्या अर्थसंकल्पात एकूण 370 कि.मी. रस्त्यांची सुधारणा करण्यात येणार आहे. यात 160 कि.मी. रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण, 172 कि.मी. रस्त्यांचे डांबरीकरण आणि 92 कि.मी. रस्त्यांचे पुनर्पृष्ठाrकरण करण्यात येणार आहे. मोठय़ा रस्त्यांपैकी शहर विभागात मनचेरजी जोशी रोड आणि मोरलँड रोड, पश्चिम उपनगरातील जेव्हीएलआर रोड, एसव्ही रोड ते महावीर नगर जोडरस्ता, सुंदर नगर मुख्य रस्ता, चर्च पखाडी रोड आणि पूर्व उपनगरातील घाटकोपर-मानखुर्द जोडरस्ता, माहुल रोड आणि एलबीएस रोड अशा मोठय़ा रस्त्यांची सुधारणा करण्यात येणार आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

फुटपाथसाठी खास तरतूद

नवीन पदपथ (फुटपाथ) धोरणानुसार पेव्हर ब्लॉकऐवजी स्टेन्सिल काँक्रीट, मार्बल चिप्ससह सिंमेंट काँक्रीट किंवा प्लेन सिमेंट काँक्रीटच्या माध्यमातून मजबूत फुटपाथ बनवण्यात येणार आहेत. यासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, तर रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवण्यात येणाऱ्या कोल्डमिक्ससाठी 15.86 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

कोस्टल रोडसाठी 1600.07 कोटी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडसाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात 1600.07 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अमरसन्स गार्डन, हाजीअली जंक्शन आणि वरळी सीफेसपर्यंतच्या 9.98 कि.मी.च्या या मार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर असून हा प्रकल्प पुढील चार वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे.

पुलांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष

पालिकेच्या माध्यमातून 344 पुलांची देखभाल केली जाते. या पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडीट तपासणीनंतर 14 पूल पाडून नव्याने बांधणे, 47 पुलांची दुरुस्ती आणि 176 पुलांची किरकोळ दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या असून या वर्षीच्या अर्थसंकल्पात 108 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.