दोन बोटांची जादू; शारीरिक व्यंगावर मात करत हरिजित काढतोय चित्रं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरिजित सिंगला चित्रकलेची आवड, पण त्याच्या हाताला फक्त दोन बोटं. त्यामुळे रंगरेषांची दुनिया त्याच्यासाठी सोपी नव्हती, पण हरिजितने हार मानली नाही. आपल्यातील उणिवांवर मात करत तो दोन बोटांनी चित्रं काढण्यात पारंगत झाला. आज या चित्रांची ऑनलाइन विक्री करून हरिजित कमाई करत आहे.

लुधियानाच्या हरिजितने लहानपणापासून चित्रकलेची आवड जोपासली. दोन बोटांनी चित्रं काढणे तसे खूपच अवघड, पण हरिजितने त्यातही प्रावीण्य मिळवले. हरिजित सांगतो, पेन्सिलने स्केच करणे सर्वात कठीण आहे. प्रत्येक रेखाटन अचूक लागतं. कारण एक चूक संपूर्ण चित्र खराब करू शकते. त्यामुळे संयमाने आणि काळजीपूर्वक काम करावे लागते. मी खूप सराव केला आणि आता स्केच करणे नीट जमू लागलंय.

हरिजितला आईवडिलांनी नेहमी प्रोत्साहन दिले. त्याने काढलेल्या कार्टून चित्रांचे शिक्षक आणि विद्यार्थी मित्र कौतुक करायचे. त्यामुळे हरिजितचा उत्साह वाढला. हरिजितचे इन्स्टाग्रामवर आर्ट पेज आहे. त्याद्वारे तो चित्रांची विक्री करतो.