किल्लेदार

387

>> विशाल देवकर

हरिश्चंद्र गड. संपूर्ण सह्याद्रीचे प्रतिरुप. जेवढा अजस्त्र तितकाच देखणा. प्रत्येक ऋतूतील याचे सौंदर्य अनुभवण्याजोगे…

पौरुषाचा मूर्तिमंत साक्षात्कार, सह्याद्रीचा मुकुटमणी, एक तपोभूमी, समस्त दुर्गप्रेमींची, भटक्यांची पंढरी इत्यादी साऱया उपाध्यांची माळ करावी आणि ती कुठल्या तरी एका किल्ल्याला अर्पण करायची झाल्यास हरिश्चंद्रगड हा पहिला मानकरी ठरेल. अर्थात ही सगळी विशेषणे, उपाध्या, उपमांचे हरिश्चंद्रगड यथोचित सार्थक करणाराच, किंबहुना कमीच पडाव्यात असाच हा गड आहे. प्रत्येक भटक्याचे हे आवडतं ठिकाण व इथल्या विठ्ठलरूपी सह्याद्रीच्या कायम वाऱया करायला भाग पाडणारे हे वेगळेच रसायन या दुर्गाने हेरले आहे. ठाणे, पुणे आणि नगर जिह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्र पर्वत म्हणजेच हरिश्चंद्रगड होय. एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड. या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर आहेच, शिवाय भूगोलदेखील विस्मयकारक आहे. इतर सर्व किल्ल्यांना मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहे, तर हरिश्चंद्रगडाला दोनचार हजार वर्षांपूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या, चहूबाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींनी नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख पाचव्या शतकातील त्रैकुटक व कलचुरी राजघराण्याच्या कारकीर्दीपासून प्रसिद्ध आहे. स्कंद, अग्नी व मत्स्य इत्यादी पुराणांत त्याचा उल्लेख आढळतो.

या गडाला इतर गडांप्रमाणे फार कुठे तटबंदी अथवा बुरूज दिसत नाही. मग नक्की ही भटक्यांची पंढरी कशावरून? हा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे…तर त्याला उत्तर आहे हरिश्चंद्रगडाच्या पश्चिमेस असलेला रौद्रभीषण ‘कोकणकडा’. या किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळ जवळ 75 फूट अंतर्वक्र असून सह्याद्रीच्या अजस्र रूपाचा हा मूर्तिमंत साक्षात्कार होय. कडय़ाच्या माथ्यावर झोपूनच आणि विशेषतः जरा जपूनच याचे विराट रूप पाहावे लागते. स्वच्छ हवा असली तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो.

सूर्यास्ताच्या वेळी पश्चिमेस नुकतीच खेळून झालेली रंगपंचमी आणि सृष्टीनिर्मात्यानं केलेली रंगांची उधळण पाहता मावळतीकडे निघालेले सूर्यनारायण पाहत बसणे म्हणजे जो स्वर्गीय आनंद आहे तो अवर्णनीयच. हे प्रत्यक्षात अनुभवायलाच हवं. इथं येऊन ज्याने इंद्रवज्र ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला असेल तो खरंच भाग्यवान म्हणावा लागेल. इंद्रवज्र म्हणजे गोलाकार इंद्रधनुष्य होय. इंद्रवज्र अनुभवायचे असल्यास पावसाळ्याच्या सुरुवातीला ज्यावेळी आपण उंचावर असू आणि ढग खाली असतील अशा वेळी ते दिसण्याची दाट शक्यता असते. मात्र निसर्गाचा वरदहस्त आपल्यावर असावा. सह्याद्रीच्या परिसरात पहिल्यांदा इंद्रवज्र दिसल्याची 1835 साली अधिकृत नोंद केली ती कर्नल साईक्स या ब्रिटिश अधिकाऱयाने, तीदेखील हरिश्चंद्रगडाच्या कोकणकडय़ावर! इंद्रवज्राचे वैशिष्टय़ असे की, जो हे दृश्य पाहतो, तो स्वतःलाच त्यात पाहतो. पाहणाऱयाचे डोके बरोबर मध्यभागी दिसते. मध्यात अत्यंत कलरफुल आणि तेजस्वी दिसणारे हे वर्तुळाकार इंद्रधनुष्याचे तेजोवलय कडेला मात्र फिकट होत जाते. पावसाळ्यात या गडाचे सौंदर्य काही औरच असते. कारवीच्या फुलांनी गडावर जणु भंडाराच उधळला असावा असा भास होतो. वनस्पतींची विविधता या गडाएवढी इतरत्र कुठेही आढळणार नाही. करवंद, कारवीच्या जाळी, धायटी, उक्षी, मदवेल, कुडा, पांगळी, हेकळ, पानफुटी, गारवेल इत्यादी वनस्पती येथे मोठय़ा प्रमाणावर आढळतात. या भागातील प्राणी वैभव मात्र शिकारीमुळे बरेच कमी झाले आहे. तरीही कोल्हे , तरस, बिबळ्या, ससे, भेकर, रानमांजरे इत्यादी प्राणी आढळतात. गडाचे सर्वोच्च शिखर तारामतीवरून नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाईची खिंड, आजोबाचा डोंगर, कळसूबाई, अलंग, मदन, कुलंग, भैरवगड, हडसर आणि चावंड हा असा दूरवरचा परिसर दिसतो.
क्रमशः

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या