
भाजप महायुतीच्या सत्ताकाळात राज्यात गुन्हेगारीने नवा उच्चांक गाठला आहे. बहुतांश गुन्हेगारी घटनांतील आरोपी हे सत्ताधारी पक्षाशी संबंधित असून त्यांना सरकारचे अभय असल्याचे वारंवार दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात घडलेल्या विविध गुन्हेगारी कृत्यांमध्ये अजित पवार गटाच्या पक्षाशी संबंधित लोकांचा मोठा सहभाग दिसून आला आहे, हे अत्यंत गंभीर असून अजित पवार गट ही गुंडांची टोळी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे या टोळीचे आका आहेत का? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
गांधीभवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, बीडच्या मस्साजोगच्या घटनेतील आरोपी, पुण्याच्या पौर्शे कार ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह प्रकरणातील आरोपी, कोयता गँग, शेल्टर होमच्या नावाखाली तरुणींच्या लैंगिक करणारा शंतनू कुकडे, त्याचा सहकारी राष्ट्रवादीचा दीपक मानकर आणि वैष्णवी हगवणे या भगिणीचा हुंड्यासाठी छळ करून तिचा जीव घेणारे राजेंद्र हगवणे हे सर्व आरोपी राष्ट्रवादीशी संबंधित आहेत. या सगळ्या प्रकरणातले आरोपी अजित दादांच्या पक्षातलेच कसे ? असा संतप्त सवाल करून या सगळ्या गुंडांचे पालकत्व सत्ताधा-यांनी घेतले आहे, त्यामुळे अशी घृणास्पद कृत्ये करण्याची यांची हिंमत होते का? या संपूर्ण प्रकरणात राज्य महिला आयोगाचा असंवेदनशीलपणा पुन्हा दिसून आला आहे. महिला आयोगाने वेळीच दखल घेतली असती तर एक निष्पाप जीव वाचला असता पण आयोगाच्या अध्यक्षांना महिलांच्या सुरक्षेपेक्षा राजकारण चमकवण्यात जास्त रस असल्याने राज्यात महिला अत्याचाराच्या दुर्देवी घटना घडत आहेत, आम्ही आयोगाचा धिक्कार करतो.