देवेंद्र यांना ‘देवाभाऊ’ नव्हे, तर ‘टक्काभाऊ’ म्हणायला हवे, काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीस यांच्यावर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील सर्व गुंडांचे बोलवते धनी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत. त्यांच्याच नेतृत्वात राज्यात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. त्यामुळे त्यांना देवाभाऊनव्हे, तर टक्काभाऊम्हणायला हवे, असा जबरदस्त टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

भविष्यात रेशीमबागेतील गोळवलकर गुरुजी व हेडगेवारांचा फोटो काढून त्याजागी अमित शहा व नरेंद्र मोदी यांचेच फोटो लागले पाहिजेत ही त्यांची मानसिकता आहे. या लोकांना संघाचे नेते व संस्थापकांचेही नाव पुसायचे आहे. त्यांना फक्त नरेंद्र मोदी व अमित शहा या दोघांचाच टेंभा मिरवायचा आहे. या मानसिकतेचे महाराष्ट्रातील नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस करत आहेत. असभ्य प्रकारचे राजकारण करत असताना केसाने गळा कापणे म्हणजे काय? लोकांना अपमानित करणे म्हणजे काय? गुंडागर्दी म्हणजे काय? या सर्वांचा बोलविता धनी केवळ देवेंद्र फडणवीस हेच आहेत. त्यामुळे त्यांना ‘देवाभाऊ’ नव्हे, तर ‘टक्काभाऊ’ म्हणणे योग्य ठरेल, असे सपकाळ म्हणाले.

भाजपमित्रपक्ष तीन मार्गांनी पैसे कमवताहेत

भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष तीन मार्गांनी पैसे कमवत आहेत. एक म्हणजे शासकीय योजनेतील भ्रष्टाचार, कोणताही निधी देत असताना त्यात टक्केवारी घेतली जात आहे. त्यामुळे देवाभाऊंना टक्काभाऊ म्हणणे चुकीचे नाही, असे सपकाळ म्हणाले. ड्रग्जची फॅक्टरी व ड्रग्जचा धंदा चालवण्यात एकनाथ शिंदे यांचे हात सरळ गुंतलेले आहेत, असेही ते या वेळी म्हणाले. पार्थ पवारांचे प्रकरण हे ज्या पद्धतीने विनाकारवाईचे बाजूला ठेवले गेले. त्याच पद्धतीने ड्रग्जची फॅक्टरी सापडल्यानंतरही त्यावर कारवाई झाली नाही, असे सपकाळ म्हणाले.

रहमान डपैत कोण? हे सर्वांनाच ठाऊक

राज्यात ड्रग्जचा खुला व्यापार सुरू आहे. त्यामुळे यामागचा रहमान डपैत कोण? असा प्रश्न पत्रकारांनी हर्षवर्धन सपकाळ यांना विचारला. याला उत्तर देताना सपकाळ म्हणाले की, रहमान कोण आहे याचे उत्तर साताऱ्याच्या ड्रग्ज फॅक्टरीतच मिळाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शेतालगत त्यांच्याच भावाच्या शेतात ड्रग्जची फॅक्टरी सापडली. तब्बल 43 कामगार तिथे पकडले गेले. या 43 कामगारांपैकी 40 कामगारांना कोणतीही चौकशी न करता, कोणतीही नावनोंदणी न करता सोडून देण्यात आले. हे 40 कामगार बंगाली होते की बांगलादेशी होते हेही माहिती नाही, असा टोला त्यांनी लगावला.