
आमदार निवासातील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण करणारे मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा हा काही पहिल्याच प्रकार नाही. हे महाशय वारंवार दादागिरी करतात, महापुरुषांचा अपमान करणे, शिविगाळ करणे, धमकी देणे असे प्रताप ते सतत करत असतात. अशा गुंड प्रवृत्तीच्या आमदाराला पक्ष तरी कसा पाठीशी घालतो, असा प्रश्न विचारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ आमदार संजय गायकवाड यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “महाराष्ट्रात सत्ताधारी आमदारांचा धुमाकूळ सुरू आहे आणि सरकारची पकड राहिलेली नाही. महायुतीच्या आमदारानी अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. संजय गायकवाड यांचे यापूर्वी फोन व्हायरल झाले होते. या माणसाला वाचाळवीर ही पदवी उपमुख्यमंत्री यांनी दिली होती. ते सातत्याने बेताल वक्तव्य करत असतात. राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस देऊ, फडणवीसांच्या तोंडात कोविडचे जंतु घाला, असे हा वाचाळवीर बोलला होता, हा विछिप्त व्यक्ती आहे.”
ते म्हणाले, “कँन्टीनवाल्याची काही चुक असेल तर सरकारकडे तक्रार करून त्याचे कंत्राट रद्द करा. विशेष म्हणजे हे सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाकाखाली सुरु आहे. नेहमी रामशास्त्री प्रभुणे सारखा आव आणणाऱ्या फडणविसांनी जागे व्हावे व कारवाई करावी.”