
सरकारने वाट्टेल ते करायचे, भ्रष्टाचार लूट करायची पण त्याविरोधात कोणी बोलायची नाही ही भाजप युती सरकारची दडपशाही आहे . मुजोर शासनाचे आणि अधिकाऱ्यांचे अपयश लपविण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचे काम चालू आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर केली आहे. राज्यातील महायुती सरकारने शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर सोशल मीडियावर शासनाच्या धोरणांवर किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर टीका, मत किंवा आक्षेप नोंदवण्यास बंदी घातली आहे. याबाबत परिपत्रक ही जारी करण्यात आलं आहे. यावरच टीका करताना सपकाळ असं म्हणाले आहेत.
X वर एक पोस्ट करत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “शिस्तीच्या नावाखाली आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला तरी, विचार करणे, प्रश्न विचारणे आणि मत मांडणे ही व्यक्तिस्वातंत्र्याची मूलभूत मूल्यं आहेत. लोकशाही केवळ मतदानात नाही, तर मत मांडण्यातही असते.”
महायुतीचा हुकूमशाही फतवा! शासकीय कर्मचाऱ्यांनी सरकारी धोरणांवर टीका केल्यास होणार कारवाई
ते म्हणाले की, “शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना कोणत्याही समाज माध्यमांवरती शासनाच्या धोरणात्मक निर्णयांवर, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयांवर तसेच, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचे मत, टिका किंवा आक्षेप नोंदवू नयेत, असा स्पष्ट इशारा देऊन शिस्तभंगाची कारवाई करण्याची सरळ धमकी दिली आहे, हे निषेधार्ह आहे.”