संतापजनक! लॉकडाऊन दरम्यान गावात पहारा देणाऱ्या लष्कराच्या जवानाची समाजकंटकांनी बोटं तोडली

3098

कोरोनाचा धोका वाढत असल्याने देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. कोरोना पसरलेल्या भागातून लोक दुसऱ्या भागात जाऊ नये आणि इतरांना याची लागण होऊ नये यासाठी राज्याच्या आणि जिल्ह्यांच्याही सीमा सील करण्यात आल्या आहेत. लोकांनी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे यासाठी पोलिसांसोबत काही गावकरी पुढाकार घेऊन सरसावले आहेत. परंतु गावकऱ्यांना मदत करणाऱ्या आणि सुट्टीसाठी गावी आलेल्या एका जवानाला याची मोठी किंमत चुकवावी लागलीय.

हरयाणाच्या करनाल जिल्ह्यातील बयाना या गावात पहारा देणाऱ्या एका लष्करातील जवानाच्या उजव्या हातांची बोटं काही समाजकंटकांनी तोडल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. लष्करात कर्तव्य निभावणारे दिलबाग सिंह सुट्टीवर आपल्या गावी आले होते. दिलबाग हे श्रीनगरमध्ये तैनात आहेत. ते 9 मार्च रोजी सुट्टीवर आले होते. 28 मार्च रोजी त्यांना परत आपल्या कर्तव्यावर हजर व्हायचे होते. परंतु, लॉकडाऊनमुळे त्यांच्या सुट्ट्या वाढवण्यात आल्या. याच दरम्यान, गावात लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन व्हावं यासाठी काही गावकऱ्यांनी पुढाकार घेतला. त्यात दिलबाग सिंह हेदेखील होते.

गावात पहारा देत असताना काही लोकांनी बाईकसह गावात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केला. गावकऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि वाद वाढला. त्यानंतर या हल्लेखोरांनी दिलबाग यांच्यावर हल्ला करत त्यांच्या हाताची बोटं तोडली.

आपली प्रतिक्रिया द्या