हरयाणात आज शपथविधी! मनोहरलाल खट्टर घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

801

हरयाणात भाजप-जेजेपी सरकारचा शपथविधी रविवारी होणार आहे. भाजपचे मनोहरलाल खट्टर हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, तर जननायक जनता पार्टीचे (जेजेपी) अध्यक्ष दुष्यंत चौटाला हे उपमुख्यमंत्री होणार आहेत.

कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे हरयाणात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली. 40 जागा जिंकणाऱया भाजपने दुष्यंत चौटाला यांच्या जेजेपीबरोबर युती केली आहे. जेजेपीकडे दहा आमदार आहेत. आज मुख्यमंत्री खट्टर आणि दुष्यंत चौटाला यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. आपल्या सरकारला 57 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र खट्टर यांनी राज्यपालांकडे दिले. यात सात अपक्ष आमदारांनीही पाठिंबा दिल्याचे म्हटले आहे. दरम्यान आज सकाळी भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी खट्टर यांची एकमताने निवड करण्यात आली. खट्टर हे दुसऱयांदा मुख्यमंत्री बनणार आहेत. दुपारी सव्वादोन वाजता उद्या नवीन सरकारचा शपथविधी होईल.

अजय चौटाला दोन आठवडे तुरुंगाबाहेर
दुष्यंत चौटाला यांचे वडील अजय चौटाला यांना दोन आठवडय़ांसाठी फर्लो मिळाला आहे. त्यामुळे उद्या (दि. 27) चौटाला हे तिहार तुरुंगाबाहेर येतील. ते मुलाच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. हरयाणातील शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात अजय चौटाला आणि त्याचे वडील ओप्रकाश चौटाला हे तिहार तुरुंगात आहेत. हरयाणाचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले ओप्रकाश चौटाला यांच्या कार्यकाळात हा शिक्षक भरती घोटाळा झाल्याचा आरोप आहे.

आपली प्रतिक्रिया द्या