ईडीच्या षड्यंत्राची सेशन कोर्टात पोलखोल, हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामिनावर 27 मार्चला सुनावणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी पॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांनी अटकपूर्व जामिनासाठी शुक्रवारी सत्र न्यायालयात धाव घेतली. या अटकपूर्व जामीन अर्जावर झालेल्या प्राथमिक सुनावणीवेळी मुश्रीफ यांच्या वकिलांनी ईडीच्या षड्यंत्राची पोलखोल केली. ईडीने मुश्रीफ यांच्या अर्जावर उत्तर सादर करण्यासाठी 29 मार्चपर्यंतची वेळ मागितली. त्यावर उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम संरक्षणानंतरची तारीख मागणे ही केवळ मुश्रीफ यांना अटक करण्याची ईडीची खेळी आहे, असा जोरदार युक्तिवाद ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी केला.

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याशी संबंधित कथित अफरातफर प्रकरणात मुश्रीफ कुटुंबीयांच्या मागे ईडी चौकशीचा ससेमिरा लागला आहे. ईडी राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई करीत असल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला आहे. उच्च न्यायालयाने 14 मार्चला त्यांना सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी दाद मागण्यास मुभा दिली होती. त्याला अनुसरून मुश्रीफ यांनी शुक्रवारी अॅड. प्रशांत पाटील यांच्यामार्फत विशेष पीएमएलए न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यापुढे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. यावेळी ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी तातडीने अटकपूर्व जामीन मंजूर करण्याबाबत विनंती केली. मात्र ईडीतर्फे अॅड. सुनील घोन्साल्विस यांनी उत्तर सादर करण्यासाठी 29 मार्चपर्यंतचा वेळ मागितला. त्यावर अॅड. पोंडा यांनी जोरदार आक्षेप घेतला.

उच्च न्यायालयाने हसन मुश्रीफ यांना ईडीच्या कारवाईपासून दोन आठवडय़ांचे अंतरिम संरक्षण दिले आहे. या अवधीत उत्तर दाखल करण्यास ईडीला काय अडचण आहे? सुनावणी लांबणीवर पडल्यास मुश्रीफ यांना उच्च न्यायालयाने दिलेले अंतरिम संरक्षण राहणार नाही व त्यांना सहज अटक करता येईल हा ईडीचा कुटील डाव आहे, असा सडेतोड युक्तिवाद अॅड. पोंडा यांनी केला. त्यानंतर न्यायालयानेही ईडीला फैलावर घेतले आणि वेळकाढूपणाबाबत जाब विचारला. यावेळी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह हे उपलब्ध नसल्याचे कारण देत अॅड. घोन्साल्विस यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तसेच न्यायालय संतप्त झाल्यामुळे ईडीने भूमिकेत नरमाई घेतली व 27 मार्चला उत्तर दाखल करण्यास तयारी दाखवली. त्याची दखल घेत न्यायालयाने सुनावणी तहकूब केली.

मुश्रीफ कुटुंबीयांना तूर्त अटक करणार नाही – ईडी
हसन मुश्रीफ यांच्या वकिलांनी अटकेच्या षड्यंत्राची पोलखोल केल्यानंतर नरमलेल्या ईडीने मुश्रीफ व त्यांच्या तिन्ही मुलांना न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत अटक करणार नसल्याची तोंडी हमी दिली. अॅड. घोन्साल्विस यांनी ईडीतर्फे ही ग्वाही दिली. याचदरम्यान मुश्रीफ यांच्या मुलांतर्फे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी तातडीच्या सुनावणीसाठी न्यायालयाला विनंती केली. त्यावर न्यायालयाने अर्जदार आणि ईडीला एका तारखेवर एकमत करण्यास सांगितले.

कायद्याची चौकट ओलांडू नका!ईडीला कोर्टाने झापले
हसन मुश्रीफ यांचा कथित सीए महेश गुरवच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी दुपारी सुनावणी झाली. यावेळी अमित देसाई यांनी ईडी नाहक आर्थिक अफरातफरशी संबंध जोडत असल्याचा दावा केला. त्यांच्या युक्तिवादाची दखल घेत सत्र न्यायालयाने ईडीचे कान उपटले. कायद्यातील तरतुदीनुसारच तपास करा, कायद्याची चौकट ओलांडू नका, उच्च न्यायालयाने आखून दिलेल्या चौकटीचे पालन करा, अशी सक्त ताकीद ईडीला दिली.