चंद्रकांत पाटलांना एवढी मस्ती कुठून आली? ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे खडे बोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

भाजपच्या आयटी सेल प्रमुखाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी केलेल्या अनुद्गारानंतर माफी मागणे दूरच; उलट मुश्रीफ यांना काय म्हणायचे ते म्हणू दे, आम्ही माफी मागणार नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ रविवारी चांगलेच भडकले. ‘चंद्रकांत पाटलांना एवढी मस्ती कुठून आली’, अशा शब्दांत मुश्रीफ यांनी खडे बोल सुनावले.

भाजप मीडिया सेलचा प्रमुख नवीनकुमार जिंदाल याने शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर अनुद्गार काढताना त्यांच्या आजारपणाचा संबंध वाझे प्रकरणाशी जोडला होता. त्यामुळे भाजपने माफी मागावी, अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी केली होती. यावर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याकडे पत्रकारांनी मुश्रीफ यांचे लक्ष वेधले. यावेळी हसन मुश्रीफ चांगलेच भडकले. ‘आपण काय चुकीचे बोललो होतो’, असा सवाल उपस्थित करत मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांचा चांगलाच समाचार घेतला.

राजकारण किती करायचं? याला काही मर्यादा

कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. राज्यात 55 हजार बालके बाधित झाली आहेत. अशा भयानक स्थितीत राजकारण किती करायचं? याला काही मर्यादा, असा सवालही मुश्रीफ यांनी केला. फडणवीस असो की चंद्रकांत पाटील दोघेही सरकार पाडण्यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत. त्यांनी कितीही प्रयत्न करू देत, महाविकास आघाडी सरकार 25 वर्षे चालणार, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारख्या प्रामाणिक व्यक्तीवर बोलणे योग्य नाही

चंद्रकांत पाटलांची लायकी नाही. कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेला उभे राहण्याची त्यांची लायकी नाही. त्यामुळेच जिल्हा सोडून त्यांना पुण्याला जावे लागले. भाजप सरकारच्या मंत्रिमंडळात अपघातानेच त्यांना महसूल, बांधकाम मंत्री ते उपमुख्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाला. कोल्हापुरातून पळून जावं लागलेल्या माणसानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारख्या प्रामाणिक व सोज्वळ व्यक्तीवर बोलणे योग्य नसल्याचे सुनावत, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे अतिशय चांगले काम करीत असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.