हाथरसमधील आरोपींची केस एपी सिंह लढणार, ‘निर्भया’ प्रकरणात बलात्काऱ्यांची मांडली होती बाजू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे मागासवर्गीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराने संपूर्ण देश ढवळून निघाला. यामुळे योगी सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. तर विदेशी फंडिंगच्या सहाय्याने राज्यात जातीय दंगली पेटवण्याचा प्लॅन असल्याचा आरोप सरकारने केला आहे. एकीकडे यामुळे दलित समाज आक्रमक होत असताना, काही संघटना आरोपींची बाजूही घेत आहेत.

अशातच दिल्ली ‘निर्भया’ कांडमध्ये बलात्काऱ्यांची बाजू मांडणारे वकील एपी सिंह हाथरसमधील आरोपींची केस लढणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आणखीनच गाजले जाण्याची शक्यता आहे. एपी सिंह यांची अखिल भारतीय क्षत्रिय महासभेतर्फे आरोपींची बाजू मांडण्यासाठी नियुक्ती करण्यात आले आहे. माजी केंद्रीय मंत्री राजा मानवेंद्र सिंह यांनी एपी सिंह यांना यासाठी शिफारस केली आहे. यासाठी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा पैसे देईल, असेही त्यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.

सवर्ण समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न
हाथरस प्रकरणाच्या माध्यमातून एससी-एसटी कायद्याचा दुरुपयोग करून सवर्ण समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे राजपूत समाजाला क्षती पोहोचली आहे, असे राजा मानवेंद्र सिंह यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे ‘खऱ्याचे खरे आणि खोतूनचे8 खोटे’ करण्यासाठी एपी सिंह यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोण आहेत एपी सिंह?
दिल्लीत बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींची एपी सिंह यांनी बाजू मांडली होती. एपी सिंह यांनी आपल्या आशिलाला वाचवण्याचा कसोशीने प्रयत्न केला होता. त्यामुळे फाशीची शिक्षाही लांबली होती. यामुळे देशभरातून त्यांच्यावर टीकाही झाली होती. मात्र त्यावेळी एपी सिंह यांनी मी कायद्याच्या तरतुदी वापरूनच आशिलाची बाजू मांडत असल्याचे म्हटले होते.