दखल – बालदोस्तांचे भावविश्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आकाश भोरडे

पुणे जिह्यातील पिंपळे जगताप येथील युवा साहित्यिक सचिन बेंडभर यांचा ‘हत्तीची सहल’ हा बाल कवितासंग्रह नुकताच चिमुकल्या बालदोस्तांसाठी भेटीला आला आहे. लहान मुलांच्या भावविश्वाशी निगडीत व त्यांना आवडणाऱया विषयाच्या एकुण एकोणपन्नास बालकविता या पुस्तकात आहेत. सचिन बेंडभर हे जरी साहित्यिक असले तरी ते प्राथमिक शिक्षक असल्याने लहान मुलांच्या आवडीनिवडी, त्यांची विचार करण्याची पद्धत तसेच त्यांच्या बालमनाला पडणारे प्रश्न या सगळ्या गोष्टींची त्यांनी योग्य गुंफण करत ‘हत्तीची सहल’ हा खजिना मुलांसाठी समोर मांडला आहे.

बालसाहित्य लिहीत असताना लहान मुलांच्या मनाचा, वयाचा व भावभावनांचा विचार करावा लागतो. सचिन बेंडभर यांच्या लेखनात ही सहजता दिसते. कवितासंग्रहाचे शीर्षक असलेली ‘हत्तीची सहल’ या पहिल्याच कवितेत कवी म्हणतात की,
अगडबंब हत्तीने काढली सहल
त्याच्या सोबत माकड अन् चतुर अस्वल
जाऊन पाहू म्हटले, माणसांचे शहर
कुठं राहतात माणसं, पाहू त्यांचं घर…
तसे पाहिले तर सहल हा सर्वांच्याच आवडीचा विषय आहे आणि त्यातच हत्ती हा लहान मुलांच्या आकर्षणाचा विषय. त्यामुळे हत्तीची सहल म्हणजे मुलांसाठी एक पर्वणीच आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देत कवी शेवटी म्हणतात की, हत्ती दादा म्हणाले, इथे काहीच नाही खरे
या सगळ्यापेक्षा, आपले जंगलच बरे
त्याचप्रमाणे घरातील लहान मुलांच्या सर्वांत जवळचे व आवडीचे नाते म्हणजे आजीआजोबा. याच आजीविषयी सांगणारी ‘आजी’ ही कविता…
शाळेतून आलेला चिमणा नातू
त्याला बघताच हसू फुटते
आनंदाने मग, घरात आल्यावर
कौतुकाने त्याचा पापा घेते
‘वाढदिवस’ या कवितेत वाघाच्या मुलाचा वाढदिवस साजरा केला जातो. मात्र वाघ मांसाहारी असल्याने शाकाहारी प्राण्यांची काय गंमत झाली. वाढदिवसाच्या कार्यक्रमात कोणत्या प्राण्याने काय काय गंमती जमती केल्या याचे सुंदर वर्णन कवीने केले आहे. त्याचप्रमाणे काही काल्पनिक गोष्टींबरोबरच आपण विज्ञानयुगात वावरत असल्याने अनेक वास्तविक बालकवितादेखील या कवितासंग्रहात आहेत. ‘मनातले प्रश्न’ या कवितेत मुलांच्या मनाला पडणाऱया प्रश्नांविषयी सांगताना कवी लिहितात,
निसर्गाचं नवल मोठं, घडत असतं नेहमी असं
कोणीतरी सांगा हो मला, नारळात पाणी येतं कसं?
एवढा मोठा खारा सागर, हिवाळ्यात जातो गोठून
असेल माहीत तर सांगा, उसात साखर येते कोठून?
असे अनेक प्रश्न सहज व सोप्या पद्धतीने कवीने बालवाचकांपुढे मांडले आहेत. अशा एकापेक्षा एक सरस हुशार कोण?, वाढदिवस, पाखरांची गाणी, चांदोबा, आकाशातील दिवाळी, जिराफाची मान, फुलपाखरू, मला वाटते, नका आम्हाला छोटे समजू, कोंबडीचा सल्ला यांसारख्या अनेक कविता वाचनीय आहेत.

आकर्षक रंगीत छपाई व प्रत्येक कवितेशी निगडित आकर्षक चित्रे, यामुळे आपलासा वाटणारा असा हा संग्रह आहे. बाल साहित्याचे पुस्तक कसे असावे याचे हे पुस्तक एक उत्तम उदाहरण आहे. सुप्रसिद्ध चित्रकार प्रतिक काटे यांनी योग्य व आकर्षक रेखाटलेले मुखपृष्ठ व आतील चित्रे पुस्तकाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातात.

हत्तीची सहल
– कवी : सचिन बेंडभर
– प्रकाशक : संस्कृती प्रकाशन, पुणे.
– एकुण पृष्ठे : 60, किंमत : 200 रुपये