महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरण: 50 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

mumbai-high-court1

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 25 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला 50 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याआधी जुलै महिन्यात झालेल्या सुनावणी वेळी न्यायालयाने राज्य सरकारला झापले. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या पुढारी आणि अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल का करत नाही, गुन्हे दाखल करण्यापासून पोलिसांना कोण रोखतंय, असा सवाल करीत हायकोर्टाने राज्य सरकारला खडसावले. एवढेच नव्हे तर पुढील सुनावणीवेळी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस उपयुक्तांना हजर राहण्यास न्यायमूर्तींनी बजावले होते.

1961 साली स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँकेत संचालक मंडळ आणि अध्यक्षांनी सूतगिरणी आणि साखर कारखान्यासाठी कोट्यवधी रुपयांची कर्जे दिली. या संचालक मंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, हसन मुश्रीफ, मधुकर चव्हाण अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समावेश आहे. या तत्कालीन संचालकांनी आपल्या काळात सूतगिरण्या आणि साखर कारखान्यांना कोट्यवधी रुपयांची कर्जे दिली, परंतु या कर्जाची परतफेड न झाल्याने बँकेचे प्रचंड नुकसान होऊन ती अवसायनात गेली आहे. त्यामुळे याप्रकरणी सुरींदर अरोरा यांनी अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली असून या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी तसेच संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी याचिकेमार्फत केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या